yuva MAharashtra “संग्रामदादा प्रेरणा पुरस्काराची घोषणा! आमदार रोहितदादा पाटील यांचा होणार सन्मान; भिलवडीत ६ सप्टेंबरला पुरस्कार सोहळा”

“संग्रामदादा प्रेरणा पुरस्काराची घोषणा! आमदार रोहितदादा पाटील यांचा होणार सन्मान; भिलवडीत ६ सप्टेंबरला पुरस्कार सोहळा”



भिलवडी | प्रतिनिधी

भिलवडी (ता. पलूस) गावचे स्वर्गीय युवक नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामदादा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘प्रेरणा पुरस्कार’ यंदा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहितदादा पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. भिलवडी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामस्थांच्या व्यापक बैठकीत प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी साहित्यिक सुभाष कवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी स्वर्गीय आर. आर. आबा पाटील आणि भिलवडीचे लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील यांच्यातील जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधांना उजाळा देण्यात आला. आर. आर. आबा पाटील हे अनेक वर्षे बाळासाहेब काका पाटील यांचा सल्ला घेत असत. त्यांच्या निवासस्थानी नियमित भेटीगाठी होत असत. विविध राजकीय आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध जिल्ह्याला परिचित होते.


                         स्व. संग्रामदादा पाटील

स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांचेही आर. आर. आबा पाटील यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. संग्रामदादा हे भिलवडी पंचक्रोशीतील प्रभावी लोकनेते म्हणून परिचित होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी परिसराच्या विकासासाठी चौफेर प्रयत्न केले. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने भिलवडी परिसरात मोठी राजकीय आणि सामाजिक पोकळी निर्माण झाली.

संग्रामदादांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक व्हावी, त्यांच्या विचारांचा तसेच सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे जावा, या उद्देशाने भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या नावाने ‘प्रेरणा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे युवा आमदार रोहितदादा पाटील यांना जाहीर झाल्याने या पुरस्काराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


                 आमदार रोहितदादा पाटील

आमदार रोहितदादा पाटील यांनी विधानसभा कामकाजात वैचारिक आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडत महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. ज्येष्ठांसह युवकांना सोबत घेऊन राजकीय चळवळीबरोबरच सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत. शेतीसाठी पाणी, रस्ते, वीज, आरोग्य यांसह विविध क्षेत्रांतील प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत यंदाच्या ‘प्रेरणा पुरस्कारासाठी’ त्यांची निवड करण्यात आली आहे.

मागील वर्षी स्वर्गीय संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानचा ‘प्रेरणा पुरस्कार’ शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना प्रदान करण्यात आला होता. यंदा हा पुरस्कार आमदार रोहितदादा पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भिलवडी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ‘प्रेरणा पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हा बँक संचालक तथा पलूस तालुक्याचे नेते महेंद्र आप्पा लाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुरस्काराची घोषणा झालेल्या बैठकीस भिलवडीचे प्रमुख नेते तथा सांगली कारखान्याचे संचालक राजूदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक पाटील, माजी सरपंच शहाजी गुरव, राहुल कांबळे, माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील, चंद्रकांत पाटील, विलास आण्णा पाटील, रमेश गणपती पाटील, दीपक पाटील, बाळासो मोरे, सनी यादव, संभाजी सूर्यवंशी, पांडुरंग टकले, सचिन खंडेराव पाटील, महावीर किणीकर, अमोल चौगुले, सचिन पाटील, दिलीप माळी, मारुती हराळे, चया जमादार, मूसा शेख, बी. डी. पाटील, शशिकांत भागवत, रशिद मुल्ला, अमू मुल्ला यांच्यासह भिलवडीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन चॅलेंजर्स दीपक पाटील यांनी केले, तर शशिकांत उंडे यांनी आभार मानले.

संग्रामदादांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला उजाळा देणारा हा पुरस्कार सोहळा भिलवडीसह पलूस तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे.


  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰