सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे दाखल असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, शिराळा व जत तालुक्यातील अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने संबंधित तालुक्यांच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मिरज येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाळवा व शिराळा तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाळवा येथे, खानापूर व आटपाडी तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, विटा येथे, कडेगाव व पलूस तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कडेगाव येथे तर जत तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जत येथे लोकअदालत घेण्यात येणार आहे.
लोकअदालतीत सहभागी होणाऱ्या पक्षकार व विधिज्ञ यांनी नियोजनानुसार लोकअदालतीमध्ये सहभागासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिनांक 19 जून 2026 अखेर संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अपील शाखेत सादर करणे आवश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


