भिलवडी दि. ०९ : भिलवडी-माळवाडी परिसरातील नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच माळवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शाखेचा शुभारंभ पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अरुण (अण्णा) लाड यांनी सहकार क्षेत्रातील संस्थांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. “क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटीने पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजाच्या जोरावर सर्वसामान्यांच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. या नवीन शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी मोठी सोय होणार असून स्थानिक विकासालाही चालना मिळेल,” असे ते म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रथमेश दिवटे, सल्लागार अँड. सतीश चौगुले, मुख्य अधिकारी सागर रेपाळ यांच्यासह संचालक दिलीप जाधव, सुरेश शिंदे, सुरेश देशमुख, जनार्दन पाटील, पंकज पाटील, घनश्याम पोळ, शिवाजी केसरे, वसंत पाटील, प्रमोद माने उपस्थित होते. तसेच शाखेच्या सल्लागार समितीचे राजेंद्र चौगुले, उदय साळुंखे, निखिल पाटील, तानाजी मोकाशी, विनोद पाणबुडे, विशाल शिंदे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, सुभाष वडेर, संजय पवार, शितल बिरनाळे, उमेश जोशी, महेश पाटील, मोहन पाटील, महावीर चौगुले, सतीश चौगुले, दिलीप मोकाशी, नितीन नवले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शाखेमुळे माळवाडी व परिसरातील नागरिकांना ठेवी, कर्ज, आर्थिक व्यवहार यांसारख्या बँकिंग सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.






