yuva MAharashtra मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे



      सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची 

जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली.

     

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे उपस्थित होते.

 

या अभियानाची सविस्तर माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेस प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे.  या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, गावे समृध्द होण्यासाठी ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देणे, ग्रामस्तरीय समित्या सक्षम करणे, ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच स्वच्छतेवर भर देणे या बाबींचा समावेश आहे. या अभियानामध्ये एकूण 8 मुख्य घटक असून यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी), जल समृध्द, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गावपातळीवर संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, समाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे व नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश आहे.

 

      या अभियानामध्ये ग्रामपंचायतीची महत्वपूर्ण भूमिका असल्याने, ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरपंच / प्रशासक यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व गाव पातळीवरील सर्व अधिकारी / कर्मचारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील. समितीचे सदस्य सचिव म्हणून "ग्रामपंचायत अधिकारी" हे काम पाहतील. उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त गुणांकन मिळविणे, हे या समितीचे महत्वाचे कार्य असणार आहे.

 

या अभियांना अंतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर तपासणी करून ग्रामपंचायतीची पुरस्काराकरिता निवड करण्यात येणार आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰