yuva MAharashtra महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त विशेष मोहिमेंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या योजना, सेवांचा लाभ घ्या - प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी

महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त विशेष मोहिमेंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या योजना, सेवांचा लाभ घ्या - प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी



 

         सांगली, दि. 18 (जि. मा. का.) :  महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिक-केंद्रित सेवा आणि योजनांचा प्रचार करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे.   दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. या सर्व योजनांचा आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे.

 

            या मोहिमेअंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजना  सेवांमध्ये पुढील प्रमुख बाबींचा समावेश आहे.

 

प्रमुख योजना आणि सेवा

            सलोखा योजना - शेतजमिनींच्या ताबा, वाटणी आणि मालकी हक्कांशी संबंधित वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ 1 हजार रूपये मुद्रांक शुल्क आणि 1 हजार रूपये नोंदणी शुल्क भरून जमिनींची अदलाबदल करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो, तसेच न्यायालयीन प्रक्रियेची गरज राहत नाही.

 

            शेतजमीन वाटणीपत्र - शेतजमिनीच्या वाटणीपत्रातील मिळकतीचे मूल्य  100 रूपये पेक्षा अधिक असल्यास, त्याची नोंदणी करणे सक्तीचे आहे. महसूल अधिकाऱ्याद्वारे केलेल्या वाटणीला नोंदणीची सक्ती नाही, परंतु त्यासाठी मुंबई मुद्रांक अधिनियम 1958, अनुच्छेद 46 नुसार मुद्रांक शुल्क भरावे लागते. महसूल अधिकाऱ्याद्वारे केलेल्या वाटणीशिवाय, इतर सर्व वाटणीपत्रांची नोंदणी बंधनकारक आहे.

 

मुद्रांक शुल्क माफी आणि सवलत

 

            शैक्षणिक कर्ज - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील मुद्रांक शुल्कात पूर्ण माफी आहे.

 

            सौर कृषी वाहिनी योजना - या योजनेतील ठराविक कागदपत्रांवर मुद्रांक शुल्कात पूर्ण सवलत दिली आहे.

 

            प्रतिज्ञापन (Affidavit) - शैक्षणिक आणि शासकीय प्रमाणपत्रांसाठी आवश्यक प्रतिज्ञापत्रांवर पूर्ण माफी आहे.

            महिला घर खरेदीदार - महिलांना निवासी सदनिका/ बांधीव घर मिळकत खरेदी करताना मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत मिळते.

 

            प्रधानमंत्री आवास योजना - या योजनेअंतर्गत दस्त नोंदणीसाठी फक्त  1 हजार रूपये मुद्रांक शुल्क आकारले जाते.

 

            रक्ताच्या नात्यातील हस्तांतरण - पती-पत्नी, मुलगा-मुलगी, नात-नातू, मयत मुलाची पत्नी यांच्यातील घर किंवा शेतजमिनीच्या विना मोबदला बक्षीसपत्रव्दारे हस्तांतरणासाठी फक्त 200 रूपये मुद्रांक शुल्क आणि 1 टक्के अधिभार लागतो.

 

            एक जिल्हा, एक नोंदणी - या सुविधेमुळे मालमत्ता ज्या जिल्ह्यात आहे, त्याच जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येते. यामुळे वेळ आणि खर्चात बचत झाली असून सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम झाली आहे.

 

            फेसलेस रजिस्ट्रेशन (Faceless Registration) - ही एक पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया आहे, ज्यात भाडेकरार, प्रथम विक्री करार (Agreement to Sale), दत्तकपत्र (Adoption Deed) आणि मुखत्यारपत्र (Power of Attorney) यांसारखे दस्त नोंद करणे शक्य आहे. ही सेवा 24 7 उपलब्ध आहे आणि यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही.

 

इतर ऑनलाइन सुविधा

 

            नागरिकांसाठी पीडीई, ई-एएसआर, ई-मूल्यांकन, -पेमेंट, ई-सर्च, आणि विवाह नोंदणी यांसारख्या अनेक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

            ई-सर्च (e-Search) - या सुविधेमुळे मालमत्ता नोंदी व व्यवहाराचे तपशील ऑनलाइन पाहता येतात. वापरकर्ते मालमत्तेच्या तपशिलावरून किंवा दस्त क्रमांकावरून माहिती शोधू शकतात.

 

            विवाह नोंदणी - विवाहांसाठी आवश्यक नोटीस/अर्ज ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून, सर्व तपशील, कागदपत्रे आणि शुल्क ऑनलाइन भरता येतात.

 


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰