yuva MAharashtra संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - ⁠जिल्हाधिकारी अशोक काकडे

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - ⁠जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

-         दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला जिल्हास्तरीय विविध यंत्रणांचा आढावा


-         पूरस्थितीतील कार्यवाहीची पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश




 

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : लगतच्या जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यात पाऊस सतत सुरू आहे.  या अनुषंगाने धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमिवर संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या.

 

संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय येथून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनडीआरएफचे टीम कमांडर सुशांत शेट्टी, आदि उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन, बीएसएनएल, परिवहन यंत्रणांचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत करावयाच्या कार्यवाहीची पूर्वतयारी करून ठेवावी. संभाव्य पूरस्थितीत करावयाच्या कार्यवाही सज्जतेचा आढावा घ्यावा. पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. तसेच, नियंत्रण कक्षाच्या नियमित संपर्कात राहावे. गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक, बालके यांना प्राधान्याने विचार करावा. कोणत्याही परिस्थितीत अफवा पसरणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

 

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने नदीच्या पाण्याची इशारा पातळी, धोका पातळी, नागरिकांच्या स्थलांतरणाची व्यवस्था, भोजन, निवास, पिण्याचे पाणी, जनावरांचे स्थलांतर, जनावरांसाठी चारा, पाण्याखाली जाणारी शेत जमीन, पूरपश्चात नियोजन, साथीच्या आजारांच्या अनुषंगाने औषधांची पुरेशी व्यवस्था, सुटका पथके, धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था, प्रथमोपचार गट, पुरेसा औषधसाठा आदिंबाबत संबंधित सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी.

 

महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, आरोग्य, जलसंपदा विभाग व सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महावितरणने पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित ठेवावा. तसेच, रूग्णालये, निवारा केंद्रांतील वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी नियोजन करावे. ट्रान्सफॉर्मर्स संरक्षित करावेत. कृषि विभागाने पंचनामे, पूरपश्चात खते, बी-बियाणांची उपलब्धता, पीकविमा तर पशुसंवर्धन विभागाने पशुधन सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होईल, यासाठी नियोजन करावे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस धोकादायक पुलावरून धावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत जीवित व वित्त हानी होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी दक्ष राहावे, असे त्यांनी सूचित केले.

 

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग व्यवस्था, अन्न व औषध प्रशासनाने निवारा केंद्रांमध्ये स्वच्छ पेयजलपुरवठा व दूषित अन्नपुरवठा होणार नाही, यासाठी तपासणी करावी. चोरीच्या घटना टाळण्यासाठी गस्त वाढवावी. अफवा पसरू नयेत, यासाठी सायबर सेलने क्रियाशील राहावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आवश्यकतेप्रमाणे मॉक ड्रिल्स घ्यावेत. बीएसएनएलने शासकीय संपर्क यंत्रणा सुरळीत राहतील, यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰