yuva MAharashtra जिल्ह्याचा विकासदर वाढवण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्ह्याचा विकासदर वाढवण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी अशोक काकडे

उद्योग विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठकीत केले आवाहन

 


        सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था 'वन ट्रिलियन डॉलर' करण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमिवर आगामी पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र विकसित होऊन जिल्ह्याचा विकास दर वाढवण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

 

            उद्योग विभागाच्या विविध समित्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णीएमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजेमहापालिकेचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक रमेश आरवाडे, मराठा उद्योजक संस्थेचे चंद्रकांत पाटील, इंडस्ट्रीयल असोसिएशन, बामणोलीचे अध्यक्ष अनंत चिमड, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे श्री. नेगांधी, ईएसआयसीचे संतोष माळवी, ईवाय कन्सल्टन्सीचे श्रीजीत नायर यांच्यासह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 



जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित  करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्याचे वार्षिक उत्पन 1 लाख 77 हजार कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून, गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या उद्योगांच्या क्षमता विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. उद्योजकांनी भावी काळाचा विचार करून आगामी पाच वर्षांत जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्र वाढीसाठी आपल्या संकल्पना मांडाव्यात, हे सांगताना त्यांनी दक्षिण कोरियातील केडिया संस्थेचे उदाहरण दिले. तसेच, शिक्षण, उद्योग क्षेत्र आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास केलेल्या अन्य देशांचे दाखले देत उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासात भर घालावी, असे आवाहन केले.

 



         औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर प्राधान्याने व सकारात्मकपणे कार्यवाही करून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ईएसआयसी रूग्णालयासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे तसेच, उद्योजकांचे महापालिका संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे सूचित केले. औद्योगिक वसाहतीतील समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी व तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने औद्योगिक संघटना व शासकीय विभाग यांनी एकत्रित व्यवहार्य उपाय अवलंबावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.




 

            यावेळी जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगार जिल्हास्तरीय समिती सभा, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सभा अंतर्गत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी बैठकीच्या अनुषंगाने माहिती सादर केली. यामध्ये औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरवणे, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, औद्योगिक वसाहत क्षेत्रातील अतिक्रमण, नियमित वीजपुरवठा, औद्योगिक वसाहतीतील विजेचे खांब काढणे, कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीत महावितरणचे सबस्टेशन, औद्यागिक वसाहती अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीगतिरोधकपथदिवे तसेच औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत सुविधाESIC रुग्णालयासाठी जागाकचरा डेपो आदिंबाबत चर्चा करण्यात आली.

       

बैठकीस जिल्ह्यातील इतर औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी तसेच महावितरण, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰