yuva MAharashtra ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यास 1 सप्टेंबरला सवलत

ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यास 1 सप्टेंबरला सवलत



 

        सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : गणपती उत्सव सणाच्या सहाव्या दिवशी सोमवार, दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक दिवसासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

           

            राज्य शासनाने ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार विशिष्ट सण, उत्सव, समारंभासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याकामी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

 

            जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2025रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शासकीय) निमित्त एक दिवस, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक दिवस, दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त एक दिवस, गणपती उत्सवानिमित्त 4 दिवस (दुसरा दिवस दि. 28 ऑगस्ट 2025, पाचवा दिवस विसर्जन दि. 31 ऑगस्ट 2025, सातवा दिवस, गौरी विसर्जन दि. 2 सप्टेंबर 2025 व अनंत चर्तुर्थी दि. 6 सप्टेंबर 2025). दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद निमित्त एक दिवस, नवरात्र उत्सव दोन दिवस (दुर्गाष्टमी दि. 30 सप्टेंबर 2025 व खंडेनवमी, दसरा दि. 2 ऑक्टोबर 2025), दिनांक 21 ऑक्टोबर 2025 दिपावली (लक्ष्मीपूजन) एक दिवस, दिनांक 25 डिसेंबर 2025 ख्रिसमस, नाताळ एक दिवस व 31 डिसेंबर निमित्त दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी एक दिवस अशा एकूण 13 दिवसासाठी  ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे.

 

            या 13 दिवसांची सवलत कायम ठेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक दिवसासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत दिली असल्याचे आदेशात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰