सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राजवाडा येथे ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यात 43 पैकी 12 अर्जांना मंजुरी मिळाली आहे. एकूण 14 लाख 45 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. ही माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. मनीषा पाटील यांनी दिली.
डॉ. मनीषा पाटील म्हणाल्या, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एकूण 20 आजार समाविष्ट आहेत. कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यासह एक एम एस डब्ल्यू आणि एक लिपिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाकडे गेल्या दोन महिन्यात 82 जणांनी चौकशी केली. त्यापैकी 43 अर्ज कक्षाकडे प्राप्त आहेत. त्यापैकी 12 अर्जांना मंजुरी मिळाली असून, एकूण 14 लाख 45 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झालेले आहे. सीएमआरएफ कक्ष मुंबई यांचेकडून योजनेत बसत नसल्याने 12 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. एकूण 19 अर्ज प्रतीक्षेत आहेत. दोन रुग्णांना धर्मादाय योजनेचा लाभ दिला असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच रुग्णांना संदर्भित केले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेमध्ये एक रुग्ण संदर्भित केला आहे.
डॉ. मनीषा पाटील म्हणाल्या, राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार जातात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा स्तरावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अर्ज करण्याकरिता मदत मिळणार असून, जिल्हा स्तरावरच अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती, संलग्न असणाऱ्या रूग्णालयांची यादी सहज उपलब्ध होत आहे. यामुळे रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबण्यास मदत होत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰