नवी दिल्ली दि. १९ : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी ३५० फूट उंच तयार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया पुतळ्याचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.
सुप्रसद्धि मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे त्यांच्या वर्कशॉपमध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे काम जलदगतीने सुरू आहे. उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी पुतळ्याच्या कामाची पाहणी केली, तसेच या प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. हा पुतळा तयार झाल्यावर जागतिक किर्तीमान तर ठरेलच सोबतच देशासाठी प्रेरणादायीही ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राम सुतार यांचे चिंरजीव अनिल सुतार प्रत्यक्ष काम पाहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी श्री बनसोडे यांनी समजून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासक आश्वासनही दिले. पुढील आठवड्यात यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित करून या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी योवळी दिली.
विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. १०० फुट उंच पादपीठासह ३५० फूट उंचीच्या या पुतळ्याचे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुतळ्याचा पायाचा भाग (बूट) ६५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद असून, त्यासाठी सुमारे २० टन धातूचा वापर होणार आहे. या पुतळ्याचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. श्री. बनसोडे यांनी पुतळ्याच्या गुणवत्तेची आणि तांत्रिक बाबींची तपासणी करून राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आज पार पडलेल्या बैठकीत राम सुतार, त्यांचे चिंरजीव अनिल सुतार, महाराष्ट्र विधानसभेचे सचिव डॉ. विलास आठवले, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, उमेश साळवी, शापुरजी पालंजीचे उमेश साळुंखे, शशी प्रभू अँड असोसिएट्सचे अतुल कैटीकवार, भदंत राहूल बोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, सुबोध भारत हे यावेळी उपस्थित होते.
तत्त्पुर्वी विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र सदनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी अलीपुर रोडवरील डॉ.आंबेडकर नॅशनल मेमोरियलला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून सामान्य माणसांही कळेल असे सुरेख संग्रहालय शासनाने बनविले असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक आकाश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनपथ येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरलाही त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत तयार करण्यात आलेली खासदार परिचय पुस्तिका श्री. बनसोडे यांना यावेळी देण्यात आली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰