सांगली, दि. १९ (जि. मा. का.) - कृषि विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2025 - 26 अंतर्गत मूल्य साखळी समूह पाच वर्षाच्या आतील सोयाबीन प्रमाणित बियाणे वितरण खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जुना पद्माळे रस्त्यावरील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव चौगुले यांच्या शेतावर सोयाबीन बियाणे-फुले किमया( केडीएस 753) या सोयाबीन बियाण्याचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी महादेव खुडे, सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी, उप कृषि अधिकारी रविकांत माने, प्रमोद पाटील, प्रदीप पाटील आदि उपस्थित होते.
श्री गजानन विकास सोसायटी सांगली या शेतकरी गटाची निवड महाडीबीटी मधून करण्यात आली होती. दहा हेक्टरच्या मूल्य साखळी समूह गटाची नोंदणी करण्यात आली होती. या गटामध्ये एकूण 25 शेतकरी आहेत व प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्राचा लाभ देण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सोयाबीन पिकाचे लागवड तंत्रज्ञान याविषयी संपूर्ण मार्गदर्शन मंडळ कृषि अधिकारी महादेव खुडे यांनी केले. सोयाबीन बियाणे निवड, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. सोयाबीन उगवण क्षमता व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेवून शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात आले.
या कार्यक्रमास बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री गजानन विकास सोसायटीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी केले. स्वागत शिवाजीराव चौगुले यांनी केले. सांगली सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक अंजुम महात यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी जयवंत पाटील, भीमराव चौगुले, दिलीप बोळाज, गजानन विकास सोसायटीचे अध्यक्ष अनिल शिंदे व इतर शेतकरी उपस्थित होते. सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी यांनी आभार मानले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰