yuva MAharashtra जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी



        सांगलीदि. 27, (जि. मा. का.) : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संभाव्य पूरबाधित क्षेत्र असलेल्या आर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट, हरिपूरचा पूल व कृष्णा नदीघाट मिरज येथे प्रत्यक्ष भेट देवून संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला. आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.




यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरजच्या तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सांगलीच्या अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, हरिपूर येथे सरपंच राजश्री तांबवेकर, अरविंद तांबवे आदि उपस्थित होते.



            यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाण्याची इशारा पातळी, धोका पातळी, नागरिकांच्या स्थलांतरणाची व्यवस्था, भोजन, निवास, पिण्याचे पाणी, जनावरांचे स्थलांतर, जनावरांसाठी चारा, पाण्याखाली जाणारी शेत जमीन, पूरपश्चात नियोजन, साथीच्या आजारांच्या अनुषंगाने औषधांची पुरेशी व्यवस्था, सुटका पथके, धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था आदिंचा तिन्ही ठिकाणी आढावा घेतला.





यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी 2019 पूरपरिस्थितीत प्रत्यक्ष काम केलेल्या नागरिकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून संभाव्य पूरपरिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने संवाद साधून मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, संभाव्य आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पाटबंधारे विभाग सज्ज आहे. या सर्वांच्या सहकार्याने संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे. वार्ड, गाव, शहर व तालुका निहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.




जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थितीत महसूल यंत्रणा, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवावा. धोक्याचा इशारा देणारे गट स्थापन करावेत. त्यांना प्रशिक्षित करावे, प्रथमोपचार गटामध्ये शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. त्यांनाही प्रथमोपचाराचे प्राथमिक प्रशिक्षण द्यावे. स्वयंसेवी संस्था, आपत्ती मित्र आदिंची संपर्क क्रमांकांसह अद्ययावत यादी तयार ठेवावी. शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधासाठा ठेवावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰