सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवरती त्वरीत अर्ज भरावेत. यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टँब ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेला असून अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ बँक तपशिल भरावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत असून योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलव्दारे दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांच्याकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत वरीष्ठ कार्यालयास मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 15 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका हद्दितील तसेच हद्दिपासून 5 कि.मी. च्या परिसरातील व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयामधील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इ. 11 वी, 12 वी तसेच इ. 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज भरावेत, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.