सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून संपूर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ् कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन शनिवार, दि. 01 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता पुणे येथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अजितराव घोरपडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कळंबी येथे होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीची मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगरविकास यांच्या समन्वयाने राज्यस्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार हा उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबवायचा आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे - 0 ते 18 वर्षे पर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे. गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा जसे की, औषधोपचार, शस्ञक्रिया देवून उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.
या मोहिमेच्या तपासणी पथकामध्ये पुरूष व महिला वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, ए. एन. एम. यांचा समावेश आहे. तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करारबध्द रुग्णालय व आरबीएसके करारबद्ध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस नियोजन करत आहेत.