सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी आयोजित प्रभात फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्टेशन चौक सांगली येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा घेतल्यानंतर प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे यांनी प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवला. स्टेशन चौक ते काँग्रेस भवन या मार्गावर ही प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नवीन मतदारांची मतदार नोंदणी करणे, मतदारांमध्ये मतदान विषयक जनजागृती करणे, प्रत्येक मतदाराला आपल्या मताचे मुल्य कळावे या हेतूने राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा करतो असे सांगून प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे म्हणाल्या, भारताचे सुरक्षित भवितव्य आपल्या हातात आहे. यासाठी मतदार नोंदणी करून सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. या प्रभात फेरीस विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला