सांगली दि. 25 (जि.मा.का.) : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
श्रीमती कस्तुरबाई वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय सांगली येथे 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश गिरीजेश कांबळे, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, प्राचार्य डॉ. बी. पी. लाडगांवकर, सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांच्यासह निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्याचा विचार करून प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूका होत असतात. आपल्या आयुष्यात आपल्याला सर्वसाधारणपणे 12 ते 13 वेळा मतदान करण्याची संधी मिळत असते. आपल्या गावाच्या, देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या कोणतीही निवडणूक असो, त्यामध्ये आपण देशहिताच्या दृष्टीने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांनी मतदार नोंदणी करावी, असे सांगून त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश गिरीजेश कांबळे म्हणाले, मतदानाचा अधिकार हा आपला संविधानिक अधिकार आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे व लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ. बी. पी. लाडगावकर म्हणाले, ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही, त्यांनी ती स्वत: करून घ्यावी. तसेच, प्रत्येकाने किमान इतर 5 जणांची मतदार नोंदणी करावी, असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
अमन पटेल यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
प्रारंभी मुख्य निर्वाचन आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रम प्रसंगी निरंतर पुनरिक्षण व संक्षिप्त कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेले बी.एल.ओ., वंचित घटक व नवमतदार नोंदीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या सेवाभावी संस्था / महाविद्यालय, मतदार दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला, भिंतीचित्र, रांगोळी, घोषवाक्य, वक्तृत्व, निबंध, पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच नवमतदारांना व दिव्यांग मतदार यांना ओळखपत्राचे वाटपही करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे यांनी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्यामागचा हेतू विशद करून त्या म्हणाल्या, युवा हे भारताचे भवितव्य आहे. प्रत्येकाने मतदार नोंदणी करावी व लोकशाही प्रणालीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन मंडल अधिकारी पंडित चव्हाण यांनी केले. आभार प्रा. डॉ. विजय सावंत यांनी मानले. कार्यक्रमास श्रीमती कस्तुरबाई वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. पी. एन. गोरे व डॉ. पी. एन. चौगुले, प्रा. डॉ. श्रीमती मगदूम यांच्यासह महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, पदाधिकारी, विविध शाळा, कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.