क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना त्रिवार अभिवादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस.
सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.
लग्नानंतर १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’
सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं. त्याच खऱ्या अर्थाने देशाची ज्ञानज्योती होत्या.
समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना सनातनी गुंड, टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.
शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या.
१८६३ मधे जोतीरावांनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. हे गृह फक्त ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.
जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत.
सावित्रीबाई फारच उदार मनाच्या होत्या. त्यांचं अंत:करण दयेने भरलेले होतं. गोरगरिबांवर त्या फार दया करीत. अन्नदान करीत. कोणासही जेऊ घालीत. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देत असत. त्यामुळे खर्च फार होत असे. एखादेवेळी ज्योतीराव त्यांना म्हणत,
“इतका खर्च करू नये.’ त्यावर त्या शांतपणे बारीक हसत आणि
“बरोबर काय न्यायचे आहे?” असे त्यांना सांगत.
त्यावर ज्योतीराव शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत. जोतीराव तापट तर सावित्रीबाई स्मितभाषी.
सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. त्या नेहमीच हसतमुख असत.
जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला.
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.
सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.
मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं.
त्या सन १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे कार्यरत होत्या. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरीब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे अशा सामाजिक कार्यात सावित्रीबाईंनी आपले नेतृत्व पनाला लावले.
सावित्रीबाईंनी आपल्या पतीबरोबर संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील; त्या हालअपेष्टा भोगल्या. सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याची ओळख
राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले :समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले : गौरवग्रंथ या ग्रंथात केली आहे.
विद्येची देवता ही सरस्वती आहे, असे पुराणातील कथा बहुजन समाजाच्या चिल्या-पिल्यांच्या संस्कारक्षम मनावर ठासून बिंबविले जाते. परंतु शिक्षणाचे महान कार्ये करणार्या सावित्रीमाईंना मात्र अनभिज्ञ ठेवल्या जाते. ही फार मोठी शोकांतिका आहे. सतीची चाल, देवदासी प्रथा, बालविवाह, विधवा केशवपण पध्दती, विधवा विवाहास बंदी, अस्पृशता इत्यादी सारख्या अनिष्ट रुढीवर व त्यांचे उदात्तीकरण करणार्या धर्मग्रंथावर फुले दांपत्यांनी प्रखर हल्ला चढविला होता.
सावित्रीमाई आपल्या ’काव्य फुले’ या संग्रहात म्हणतात-
“ज्ञान नाही, विद्या नाही,
ते घेण्याची गोडी नाही,
बुध्दी असूनी चालत नाही,
तयास मानव म्हणावे का ?”
प्रारब्ध आणि दैवाचा फैलाव करणारा रामदास स्वामी यांचा श्लोक सावित्रीमाईं खालील प्रमाणे दुरुस्त करतात-
रामदासांचा श्लोक
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विचारी मना तूच शोधोनी पाहे !
मना त्वाची ते पूर्व संचित केले !
तया सारखे भोगणे प्राप्त झाले !!
सावित्रीमाईंचा दुरुस्त श्लोक…..
जगी सर्व सुखी असा एक आहे !
विचारी मना तूच शोधोनी पाहे !
मना त्वाची ते ज्ञान संचित केले !
तया सारखे सौख्य प्राप्त झाले !!
अशा प्रखर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!!!
आर.के.जुमळे
३.१.२०२५
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰