yuva MAharashtra 'क्रांती' कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीसाठी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरची यशस्वी चाचणी ; लवकरच हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवणार: आ. अरुण लाड

'क्रांती' कारखान्यामध्ये ऊस वाहतुकीसाठी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरची यशस्वी चाचणी ; लवकरच हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवणार: आ. अरुण लाड

लवकरच हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवणार: आ. अरुण लाड



पलूस कुंडल  : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल येथे पार पडले. या ट्रॅक्टरचे पूजन कारखान्याचे संस्थापक संचालक, पदवीधर आ. अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या आणि इको-फ्रेंडली सोल्यूशन्सला प्रोत्साहन देण्यासाठी श्री. नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन, ऑटो नेक्स्ट कृषी आणि औद्योगिक पद्धतींमध्ये स्टार्ट अप म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी क्रांतिकारक ४५ एच.पी. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, जो आधुनिक शेती व साखर उद्योगासाठी एक शाश्वत उपाय ठरू शकतो.


नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) हे साखर कारखान्यांमध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि घरातील ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर करत आहे. कारखान्याचे १० कि.मी. परिघात ऊस, बगॅस, प्रेस मड आणि राख यांची वाहतूक सुलभ पद्धतीने होण्यासाठी या ट्रॅक्टरचा वापर होऊ शकतो. हा ट्रॅक्टर २० मे. टन ऊस सहज वाहतूक करण्यास सक्षम आहे. याची बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी ३० युनिट वीज खर्च होते, ज्याची किंमत अंदाजे ३०० रुपये इतकी आहे. परंतु या २० कि.मी. च्या पहिल्या प्रात्यक्षिकात असे समोर आले की, साधारणपणे एकावेळी ७५% बॅटरी म्हणजेच २२० रुपयांची वीज खर्च होते. या तुलनेत डिझेलचा हिशोब पाहिला तर एवढ्या अंतरासाठी १२०० रुपयांचा खर्च येऊ शकतो. अशापद्धतीने दोन्ही खर्चातील जवळपास १००० रुपयांचे अंतर पाहता या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे अधिक आर्थिक बचत होण्यास मदत होईल. तसेच पॉवर बँक आणि सोलर पॅनेल युनिटची सुविधा सुद्धा भविष्यात उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
भारतातील शेतीत काळानुसार अनेक आमूलाग्र बदल झाले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना आपण पाहतोय. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळाचा तुटवडा भासत असतानाच हार्वेस्टिंग मशीनच्या माध्यमातून हजारो एकर क्षेत्रावर जलद गतीने ऊसतोडणी पार पडत आहे. त्याचपद्धतीने ऊस वाहतूकीचा खर्च आणि पेट्रोल, डिझेलवरती चालणाऱ्या वाहनांनी ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता ४५ एच. पी. च्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा फायदा होईल, असं वाटतय. याशिवाय काही आवश्यक सुधारणाही यामध्ये होणे गरजेचे आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळात लवकरच हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवतील, असा विश्वास आ. लाड यांनी व्यक्त केला.
सदर ट्रॅक्टर पूजन व प्रात्यक्षिक कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊसविकास अधिकारी विलास जाधव, कोजन मॅनेजर संदीप भोजे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰