सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत जिल्हा व तालुका पातळीवरून किमान 100 शेतकऱ्यांकडून दि. 30 जानेवारी 2025 पर्यंत अभिप्राय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकरी वर्गाला शेती उपयोगी यंत्रे व औजारे बाबीचा अनुदान तत्वावर लाभ दिला जातो. हे अनुदान केंद्र सरकार व राज्य शासनाच्या हिस्सेदारीने दिले जाते. ही लाभ देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या अधिकृत पोर्टल महाडीबीटी याव्दारे ऑनलाईन पध्दतीने केली जाते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांना आवश्यक यंत्र व अवजारे करिता पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या सोडतीमध्ये ज्या अर्जदारांचे नाव येईल ते शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. या अर्ज व सोडत प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. यामध्ये 50 टक्के शेतकरी हे मागील 3 वर्षात योजनेचे लाभ घेतलेले व 50 टक्के शेतकरी पुढील कालावधीमध्ये योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांचे अभिप्राय घेण्याच्या अनुषंगने प्रश्नसूची पुढीलप्रमाणे आहे. सध्याची सोडत पध्दत योग्य आहे का ?, सोडत पध्दत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीची असावी असे वाटते का ?, प्रचलित सोडत पध्दत किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी कोणती सोडत पध्दत प्राधान्याने राबवावी ?, याबाबतचे आपले काही नवीन अभिप्राय असल्यास तेही सुचवावेत, अशी प्रश्नसूची आहे.