BANNER

The Janshakti News

भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. नितीन सावंत यांची सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे नियुक्ती... भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहा. पो. नि.भगवान पालवे यांनी पदभार स्वीकारला...



सांगली/भिलवडी :          दि. २० जून २०२४

  भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांची सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे नियुक्ती झाली तर भगवान पालवे यांनी गुरुवार दिनांक 20 जून 2024 रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.


पालवे यांनी यापूर्वी  गडचिरोली  भांबरागड  या  नक्षलवादी क्षेत्रातील पोलीस ठाण्यापासून आपल्या कार्याची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात धडाकेबाज काम करीत, पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड या पोलिस ठाण्यामध्ये काम पाहिले. त्यानंतर त्यांची सांगली जिल्ह्यामध्ये बदली झाली. सांगली जिल्ह्यातील कार्यकालामध्ये त्यांनी वाहतूक नियंत्रण व स्थानिक गुन्हे अन्वेषण या विभागांमध्ये काम पाहिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये कार्यरत  असताना म्हैशाळ प्रकरणामधील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी भगवान पालवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भिलवडी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याने ते भिलवडी आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, आपले कर्तव्य बजावतील तसेच अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटू लागला आहे. 


स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखा येथे नियुक्त झालेले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकालामध्ये भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील गावांमध्ये गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई केल्याने येथील क्राईम रेट एकदम कमी झाला असल्याचे दिसून येते. त्यांनी अनेक अवैद्य व्यवसायांना आळा घातला होता तसेच अनेक संवेदनशील गुन्ह्यातील प्रकरणांमध्ये नितीन सावंत यांनी अगदी शिताफीने मार्ग काढून, सामाजिक समतोल राखण्याचे कार्य केले आहे. नितीन सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्याकडे पदभार सोपविला.

 यावेळी नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकालामध्ये आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी चांगले काम करीत, आपले कर्तव्य बजावले त्यांचे  पाठबळ व सहकारी मिळाल्याने चांगले काम करू शकल्याचे सांगून आपल्या सहकारी पोलीस बंधू-भगिनींचे आभार मानले.


यावेळी बोलताना नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले की, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील नागरिकांनी कोणतीही  समस्या असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन. यावेळी भिलवडी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या कार्यकालमध्ये चांगले काम केल्याबद्दल नितीन सावंत यांचा तर नूतन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा स्वागतपर सत्कार केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖