BANNER

The Janshakti News

हुमणी कीड व्यवस्थापन







हुमणी कीड व्यवस्थापन

 

        हुमणी कीड नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत हुमणी कीड व्यवस्थापन मोहिम कृषी सहाय्यकांच्या मार्फत गावोगावी राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

 

एकात्मिक व्यवस्थापन

ऊस व इतर पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असलेला दिसून येत आहे. हुमणी ही एक बहुभक्षी कीड असून सन १९७५ पासूनच राष्ट्रीय महत्वाची कीड म्हणून परिचित आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे ३०० प्रजातींची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात या किडीच्या प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या प्रजाती आढळून येतात. त्यापैकी होलोट्रॉकिया सिराटा (माळावरील हुमणी) या प्रजातीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इ. जिल्ह्यांत दिसून येतो. तर ल्युकोफोलीस लेपिडोफोरा (नदीकाठावरील हुमणी) या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव कोल्हापूर आणि सांगली जिल्हाच्या पश्चिम भागात आढळून येतो. त्याचबरोबर मागील ५-६ वर्षापासून (फायलोग्यँथस आणि ऑडोरेट्स) या दोन नवीन हुमणी हलक्या जमिनीत व प्रामुख्याने कमी पाण्याच्या प्रदेशात आढळत आहेत.

 

या किडीचे वेळेत नियंत्रण केले नाही तर किडीमुळे पिकाचे जवळपास ३० ते ८० टक्क्यापर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. किडीचा जर विचार केला तर या किडीचा जीवनक्रम हा भुंगेरा, अळी, अंडी व कोष या चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो. वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात सुप्तावस्थेतील भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर हे भुंगेरे बाभूळ, कडुनिंब किंवा बोर या यजमान झाडावर हल्ला करून त्यांची पाने खाण्यास सुरुवात करतात. या झाडांवर नर भुंगेरे आणि मादी भुंगेरे यांचे मीलन होते. मीलन झाल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे होतात व परत झाडाची पाने खातात.

 


भुगेऱ्यांचे बंदोबस्तः

१) शेतात वळीव पावसानंतर १ मीटर रुंद, ३ मीटर लांब व अर्धा मीटर खोल खड्डा करावा. ज्यामध्ये पिवळे प्लास्टिकचे आच्छादन पसरून त्यात रॉकेल किंवा डिझेल मिश्रित पाणी भरावे. आणि त्या खड्यावर रात्रीच्या वेळेस विजेचा बल्ब टांगावा, भुंगेरे प्रकाशाकडे जास्त आकर्षित होतात. यामुळे विजेच्या बल्ब खाली असलेल्या खड्यामध्ये किंवा ठेवलेल्या भांड्यामधील रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये पडून मरून जातात व हुमणी नियंत्रित करणे शक्य होते. एक प्रकाश सापळा १ हेक्टर जमिनीस पुरेसा आहे.

 

२) शेतातील कडूनिंब, बाभळी, बोर इ. झाडांवर प्रौढ भुंगेरे पाने खाण्यासाठी पहिल्या पावसानंतर जमा झालेले आढळतात. अशा झाडांच्या फांद्या रात्रीच्या वेळी काठीने हलवल्यास भुंगेरे खाली पडतात. खाली पडलेले भुगेरे गोळा करून रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून नष्ट करावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास, किडीचा अंडी घालण्यापुर्वीच नायनाट करता येतो.

३) प्रौढ भुंगेरे यजमान झाडांवर आढळून येत असल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ एस. एल. ३ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारल्यास भुंगेऱ्यांचे नियंत्रण होते.


हुमणी अळीचा बंदोबस्तः-

१) शेतात आंतर मशागतीच्या कामांच्या वेळी अळ्या गोळा कराव्यात व लोखंडी हुक किंवा खुरप्याने माराव्यात. २) सापळा पिकांचा वापर ताग, एरंडी, अथवा भुईमुग पिकांचा सापळा पिके लावून वापर करावा. ३) सदर पिके उसाच्या सऱ्यांमध्ये ठीक ठिकाणी लावावीत व मलूल होऊन कोमेजलेल्या झाडांखालीत अळ्या गोळा करून माराव्यात. ४) पिकास पाणी देतांना ते जास्त काळ साचून राहील पाकडे, लक्ष दयावे, जेणेकरून साचलेल्या पाण्यामुळे मुळांजवळ लपलेल्या अळ्यांना प्राणवायु मिळण्यात अडथळा येऊन त्या मरतील. ५) अति प्रादुर्भावग्रस्त शेतात खोडवा घेणे प्रकर्षाने टाळावे, सूर्यफुलाचे पीक घेऊन त्यानंतर शेताची ३-४ वेळा खोलवर नांगरट करावी.

 

जैविक नियंत्रण:-

१) परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बासियाना बिव्हेरीया बैंगोनीटी, मेटॅरीझीअम अॅनिसोप्ली तसेच जीवाणू,  ब्यॉसिलस पॉपिली यांचा वापर पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या सेंद्रिय खतामध्ये मिसळून कीड नियंत्रणासाठी करता येतो. २) एटोमो प्याथोजेनिक निमटोड म्हणजे कीटकांना बाधित करणारे सूत्रकृमी हे होलोट्रॉकिया हुमणीच्या शरीरातील छिद्रावाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करतात. किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसऱ्या हुमणीला शोधून बाधित करतात. ई. पी. एन. चा वापर करताना एकरी एक लिटर द्रावण प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळांशी वाफसा स्थितीत आळवणी केली असता हुमणीचे प्रभावी नियंत्रण होते. सदर सूत्रकृमिचा जमिनीतील उपयुक्त जीवाणू, तसेच इतर पिके तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नसल्याने त्यांचा वापर सुरक्षित ठरतो. ३) शक्यतो शेतीचे मशागत दिवसा करण्यात यावी. तसेच हुमणीरा निसर्गता शत्रू असलेले बगळा, निमणी, मैता, कावळा, धार ई. पक्षी तसेच मांजर, मुंगुस, कुत्रा, रानडुक्कर इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खाताना दिसतात.

 

रासायनिक नियंत्रण:-

सुरवातीला फिप्रोनिल ३% दाणेदार ३३ किलो प्रती हेक्टर माती मध्ये मिसळून द्यावे, हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या ऊसात आढळून येत असल्यास फिप्रोनिल ४०% इमिडाक्लीप्रीड ४०% डब्ल्यू, जी. हे संयुक्त कीटकनाशक प्रती हेक्टरी ५०० ग्रॅम १२५० लिटर पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या ओळीत सोडावे. अशा तऱ्हेने हुमणीचे नियंत्रण शेतकरी बंधूनी सामुदायिक मोहिमेच्या स्वरुपात जास्तीत जास्त भुगेरे गोळा करून नष्ट केल्यास प्रभावी व सर्वात कमी खर्चीक उपक्रम म्हणून करता येईल.

 

 प्रकाश सापळे प्रत्येक शेतकऱ्यांनी लावावेज, लिंब, कडूनिंब, बाभळच्या झाडांवर प्रौढ भुंगेरे यजमान आढळून येत असल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ एस. एल. ३ मिली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारल्यास भुगेऱ्यांचे नियंत्रण होते. तसेच हुमणी कीड हे, भुंगेऱ्याच्या आवस्थेत जास्त प्रमाणात नियंत्रित होत असल्याचे शेतकऱ्यांची या मोहिमेत सहभागी व्हावे.

 

संकलन-‍

जिल्हा माहिती कार्यालय,सांगली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖