लोकसभेच्या निवडणुका संपल्या. पुढे काय…???
पण हातावर हात ठेऊन बसायची ही वेळ नाही. रात्र वैऱ्याची आहे. आपण यापुढे तरी सजग व्हायला पाहिजे. ‘जागृतीचा दिवा विझायला नको’ या उपदेशाचा बाळकडू आपण पिलेले आहोत.
महाराष्ट्रात आता तीन महिन्यांत विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे. त्यादृष्टीने समाजातील जबाबदार बुद्धीवंत, विचारवंत वर्गांनी अत्यंत सखोलपणे कस लावून विचारविनिमय करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
हे खरं आहे की, आपला समाज केवळ गटा-तटांमध्येच नव्हे, तर इतरही लहान लहान पक्षांमध्येही विखुरला गेला आहे. त्यामुळे आपणच आपली ताकद कमी करून टाकली आहे.
आपला समाजच जर एकसंघ नसेल, तर इतर समाज आपल्याला कशी मदत करणार? हाही मोठा प्रश्न आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्यामधील विखुरलेले गट आणि पक्ष एकत्र करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पर्याय नाही.
आपल्याला हेही लक्षात घ्यावे लागेल की, आंबेडकरी समाजाचे एवढे मतदान नाही की, आपल्या मतावर आपले आमदार स्वतंत्रपणे निवडून आणता येईल. म्हणून काही प्रमाणात तडजोड ही करावीच लागेल. त्यासाठी मुळात आपल्या पुढाऱ्यांच्या हेकेखोर आणि अहंकारपणाच्या सवयीला मुरड घालावी लागेल.
‘एकला चलोरे’च्या भुमिकेने समाजाचं फार मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आपला नाही तर कुणाचा तरी फायदा होतो आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे.
लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात काय झालं? याचाही धडा आपण शिकायला पाहिजे.
आंबेडकरी विचारांची राजकीय व सामाजिक चळवळ महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांमध्ये प्रभावी आहे. मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळू नये, यासाठी दोन्ही राज्यांमधील आंबेडकरी विचारांचा प्रभाव असलेल्या मतदारांनी इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहण्याचा जाणीवपूर्व प्रयत्न केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. हा अनुभव लक्षात घेऊनच आपल्याला पुढील आखणी करावी लागेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शासनकर्ती जमात’ बनण्याचा उपदेश समाजाला केला होता. तो प्रयोग एकेकाळी मा. कांशीरामजी यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना सामाजिक परतफेडीची जाणीव करून देऊन एका राज्यात का होईना सफल केला होता. पण ते गेल्यानंतर परत आपण मागे फिरलो आहोत.
म्हणून त्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आंबेडकरी राजकारणाची रणनीती कशी असावी या दृष्टीने विचारविनिमय होणं अत्यंत गरजेचं आहे. तरी अगदी तळमळीनं विचारवंतांनी व्यक्त व्हावं अशी अपेक्षा आहे.
विद्रोही कवी सोपान ओव्हाळ, आपल्या कवितेतून समाजाला जागे करण्यासाठी म्हणतात,
२४ सप्टेबर १९४४ मद्रास (चेन्नई) पार्क टाऊन, मद्रास ईलाखा, शेडूल कास्ट फेडरेशनची जाहीर सभा…"तुमच्या समोर उद्दीष्ट काय आहे ते निट समजून घ्या.शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दीष्ट व आकांशा आहे!हे तुमच्या मनात ठसू द्या.तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा म्हणजे रोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढ़त आहोत, ते काही लहान-सहान संकुचीत ध्येय नाही.थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आपला लढा नाही.अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत, "शासनकर्ती जमात बनने हिच ती आकांक्षा होय!"— डॉ.बाबासाहेब आंबेडकर
लेखनकर्ते --
आर.के.जुमळे (अकोला, महाराष्ट्र)
दि. ६.६.२०२४
Youtube Link
👇