BANNER

The Janshakti News

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; तिघे निर्दोष,


११ वर्षांनंतर मे.विशेष न्यायालयाचा निकाल




पुणे ता. ११ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला. 



आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना मे.विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला. 
मे.विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी  सकाळी ११ वाजता विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू झाली. 
यावेळी वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना मे.न्यायालयात हजर करण्यात आले होते. सी.बी.आय.चे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी, बचाव पक्षाचे ॲड.प्रकाश साळशिंगीकर,ॲड.वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. 

डॉ. दाभोलकर यांची ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर ए.टी.एस. आणि नंतर हे प्रकरण सी.बी.आय.कडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती. 

या पाचजणांवर दोषारोपपत्र दाखल करताना डॉ. तावडे याने खुनाचा कट रचला, अंदुरे आणि कळसकर यांनी गोळ्या झाडल्या, भावे याने घटनास्थळाची रेकी केली,
 तर पुनाळेकर यांनी गुह्यातील शस्त्र् नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

१५ सप्टेंबर २०२१ रोजी पाचजणांवर आरोपनिश्चिती करण्यात आली. सी.बी.आय.तर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळशिंगीकर,ॲड.वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. 

मे.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सी.बी.आय.ने वेगवेगळ्या ‘थिअरी’ मांडल्या असून, वेगवेगळ्या लोकांना हल्लेखोर म्हणून अटक केली. 
त्यानंतर अंदुरे आणि कळसकर यांना अटक केली.
 त्यांना मे.न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
या निकालाचा आम्ही आदर करीत असून, त्याचा सविस्तर अभ्यास केल्यावर मे.उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात 
अंदुरे, कळसकर यांना शिक्षा होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. हे दोघे पानसरे, 
गौरी लंकेश आणि नालासोपारा आर्म पर्ह्स गुह्यामध्येदेखील सहभागी आहेत. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात विशिष्ट विचारधारेचा सहभाग असल्याचे दिसते. 

ज्या तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यांच्याविरुद्ध मे.उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. 

मुक्ता दाभोलकर

विवेकवाद्यांची हत्या हा व्यापक कटाचा भाग आहे. 

डॉ. दाभोलकर, 
डॉ. कलबुर्गी, 
गोविंद पानसरे, 
गौरी लंकेश 
यांची हत्या गंभीर आहे. 
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या गुह्यातून डॉ. तावडे याची सुटका झाली असली, 
तरी पानसरे खुनामध्येदेखील त्याचा सहभाग आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी सबळ पुरावे निदर्शनास आणावेत. डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निर्णय हा इतर तीन गुह्यांच्या खटल्यावर परिणाम करणार आहे. 

मात्र, मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. 

मेधा पानसरे

आमच्याकडे 
डॉ. तावडे याच्याविरोधात पुरावे होते. 
कोल्हापूरच्या एका साक्षीदाराने तावडेविरुद्ध साक्ष दिली होती; 
पण तहीरी आम्ही या निकालाचे स्वागत करतो. 

सूर्यवंशी,
सरकारी वकील

मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या…

 दाभोलकर कुटुंबीय मे.उच्चन्यायालयात दाद मागणार
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली,
 ही समाधानाची बाब आहे. 

मात्र, हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
 या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्यामध्ये तपास यंत्रणांना अपयश आल्याची खंत आहे. 
या प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 त्यामुळे याबाबत मे.उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, 

असे दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद यांनी सांगितले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖