BANNER

The Janshakti News

क्रांती कुस्ती केंद्राचे मल्ल झळकले राष्ट्रीय पातळीवर


क्रांती कुस्ती केंद्राचे मल्ल झळकले राष्ट्रीय पातळीवर ;
येत्या ऑलम्पिकमध्ये ही झळकतील ....आमदार अरुणअण्णा लाड.


कुंडल  वार्ताहर  दि. ०८ एप्रिल २०२४

  क्रांती कुस्ती केंद्राचे मल्ल परिसरातील मैदानात झळकत आहेतच पण आता हे मल्ल देशपातळीवर देखील झळकत आहेत असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.

ते नोएडा येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय स्थरावरील कुस्ती स्पर्धेत क्रांती कुस्ती केंद्रातील मल्ल शिवाजी लिंगाप्पा शिरोळे याने प्रथम तर अविनाश बिरु चिटके याने तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, मल्लांमध्ये स्पर्धा वाढली तर त्यांचा कस लागतो. आपण यापुढे मातीतील कुस्ती तर जपणार आहोतच पण वेळेनुसार मॅटवरीलही कुस्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्रांती कुस्ती केंद्राकडून ऑलम्पिकसाठी 20 मुलं दत्तक घेतली आहेत त्यांना लागेल ते सर्व दिले जातेय यातून भविष्यात चांगले मल्ल घडतील. राष्ट्रीय पातळीवर जे दोन मल्ल चमकले आहेत ते आगामी एशियन गेम्ससाठी ही पात्र ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर कुस्तीचे खच्चीकरण सुरू आहे पण कोणत्याही मल्लाने त्याकडे लक्ष न देता सराव सुरूच ठेवावा. भविष्यात देशासाठी आपल्यातील मल्ल खेळले पाहिजेत आणि जिंकलेही पाहिजेत यासाठी क्रांती कुटुंब लागेल ते सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी यावेळी मल्लांना दिला.

यावेळी शरद लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापूंचे स्वप्न होते आपल्या परिसरात जागतिक दर्जाचा मल्ल घडावा यासाठीच आपण ऑलम्पिकसाठी मल्ल दत्तक घेतले त्या प्रयत्नाचे हे पहिले यश म्हणावे लागेल. क्रांती कुस्ती केंद्राची स्थापना मन मेंदू बळकट करणाऱ्या खेळाला मोठं करायचं याच उद्देशाने झाली आणि त्याचे आज सार्थक होताना दिसते आहे.

या कुस्ती केंद्रातील मल्लांचा आजवर आम्ही कोठेही राजकीय वापर केला नाही आणि करणार ही नाही. उलट आमच्या राजकारणाचा त्यांच्या आयुष्यासाठी लागेल तेथे आणि लागेल तेवढा फायदा उपयोग करून हे मल्ल घडवले जात आहेत. मातीतील कुस्तीपेक्षा मॅटवरील कुस्तीला भविष्य असल्याचे जाणवल्यावर आम्ही तो बदल केला आणि यशस्वी सुरुवात ही झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशिक्षक मेहेबूब शेख, अमोल यादव, विकास पाटील (बोरगाव), विलास पाटील, विजय पाटील (नागठाणे), विजय पाटील (तुपारी)
सरपंच जयराज होवाळ, माजी उपसभापती अरुण पवार, प्रकाश पुजारी, कुंडलिक एडके, प्रीतम लाड, दिनकर लाड, सदस्य किरण लाड, राहुल लाड,अशोक पवार, गोविंद डुबल, संदीप पवार यांचेसह कुस्ती केंद्राचे मल्ल उपस्थित होते.


मल्ल राष्ट्रीय पातळीवर चमकला की अनेकजण त्यांना मदत करायला येतात, मग त्याच्या यशाची पळवापळवी सुरू होते. पण गरजेच्यावेळी ज्यांनी मदत केली त्यांच्याशी बांधील राहिलात तर मदत करणाऱ्यांचे मनोबल अजून वाढते... शरद लाड.



नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत झळकलेल्या दोन मल्लांचा सत्कार करताना आमदार अरुणअण्णा लाड, शरद लाड आदी.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆