======================================
======================================
मुंबई / ठाणे : महात्मा गांधींनी पायी चालत अनेक आंदोलने केली. ते देखील ३६०० किलोमीटर पायी चालले नाहीत. मात्र महात्मा गांधींच्या दांडी यात्रेतून प्रेरणा घेऊन राहुल गांधी या तरुणाने भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे. ही यात्रा १५ मार्च भिवंडी आणि १६ मार्चला कौसा – मुंब्र्यातून निघून कळवा आणि ठाणे शहरातून मुंबईला जाईल. कुठेही सभा होणार नाही, ठिकठिकाणी जनता, संस्थांकडून स्वागत स्वीकारले जाईल आणि मुंबईतही चैतन्यभूमीवर यात्रेच्या समारोपाची सभा होईल, त्याठिकाणी प्रियांका गांधीही सहभागी होतील, अशी माहिती इंडिया आघाडीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऍड विक्रांत चव्हाण आणि खासदार राजन विचारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे पक्षाचा झेंडा न घेता मोहोब्बत की दुकान घेऊन भारत जोडो न्याय यात्रेला घेऊन मणिपूर वरून निघाले आहेत. आज ते महाराष्ट्रात दाखल झाले असून १५ मार्चला भिवंडीत येतील आणि तिथे मुक्काम करतील.
त्यानंतर १५ मार्चला खारेगाव नाक्यावरून मुंब्रा रेतीबंदर मार्गे कौसा येथून यात्रेला सुरुवात करतील. कौसा, मुंब्रा, कळवा मार्गे यात्रा येईल. राहुल गांधी हे कळवा नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर ही यात्रा ठाणे शहरात प्रवेश करेल. ठाण्यातील जांभळी नाक्यावरील मासुंदा तलावाजवळ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. कुठेही स्टेज उभारण्यात येणार नाही, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते कुठेही जाहीर सभा घेणार नसून गाडीमधून लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या वाहनामध्ये स्थानिक आजी माजी आमदार, खासदार सोबत असणार असल्याची माहिती भारत जोडो न्याय यात्रेचे ठाण्याचे समन्वयक ऍड विक्रांत चव्हाण यांनी दिली.
ही अराजकीय यात्रा असून त्यात सर्व पक्षिय कार्यकर्ते, ज्यांना लोकशाही वाचवायचे आहे, ते नागरिक, समविचारी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याने मीडियाला त्याची दखल घ्यावी लागत आहे, अशी ही खंत व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान नेहरू यांच्याप्रमाणे राहुल गांधी थेट लोकांमध्ये घुसून संवाद साधत असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या हुकूमशाही विरोधात एकमेव तरुण नेता तिरंगा हातात घेऊन लढत असल्याचे आव्हाड यांनी सांगून सर्व ठाणेकरांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच लोकसभा आचारसंहिता लागली तरी यात्रेला काही फरक पडणार नसून ही जनतेची यात्रा आहे. मुंबईतील सभेवरही आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनासुद्धा निमंत्रण काँग्रेसच्या वतीनं देण्यात येणार असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणी प्रियंका गांधी ,
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆