BANNER

The Janshakti News

लोकसभा निवडणूक 2024 निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची - डॉ. किरण कुलकर्णी


'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात लोकसभा निवडणूक - 2024 निमित्त विशेष मुलाखत




            मुंबई दि. 28 : निवडणुकीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या, समाज माध्यमे तसेच ती माध्यमे वापरणाऱ्या सर्वांनी जबाबदारीने ती हाताळावीत आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन करावे, असे आवाहन राज्य माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाचे, नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून केले.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 'माध्यमांची भूमिका आणि नागरिकांची जबाबदारी' यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. याअनुषंगानेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पेड न्यूजच्या संदर्भात तक्रारीसाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती स्थापन केली आहे. तसेच प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांना आपल्या जाहिरातीचे प्रमाणीकरण (प्री सर्टिफिकेशन) करण्यासाठी जिल्हा तसेच राज्य पातळीवर जाहिरात प्रमाणीकरण समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कशा प्रकारे कामकाज करण्यात येणार आहे तसेच माध्यमांनी आणि नागरिकांनी मुक्त व निर्भिड वातावरणात राज्यातील निवडणूक पार पडण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत सोमवार दि. १, मंगळवार दि. २ आणि बुधवार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, तर 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆