BANNER

The Janshakti News

बीड : गेवराईत जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; ५० जेसीबीतून पुष्पवृष्टी



=====================================
=====================================

बीड/गेवराई  :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील हे मुंबईकडे जात असताना गेवराई येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ५० जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच त्यांच्या स्वागतासाठी ठीकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे -पाटील अंतरवाली सराटीतून आज (दि. २०) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांचे गेवराई तालुक्यात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळ पासून आबालवृद्ध रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. 

गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचे आगमन झाले. यावेळी ५० जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात आली.  यावेळी शेकडो तोफांची सलामी देण्यात आली. एक मराठा लाख मराठा या घोषणेने शहर दणाणून गेले होते. भगव्या झेंडयांनी शहर गजबजले होते. दरम्यान, मराठा बांधवांसाठी कोळगाव येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील आसपासच्या ५० गावांनी भाजी भाकरी पिठलं, अशा जेवणाची २० ठिकाणी सोय केली होती. तसेच ठिकठिकाणी पाण्याची देखील सोय करण्यात आली होती.  तर गेवराई शहरामध्ये मराठा बांधवांच्या वतीने जरांगे -पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर असंख्य गाड्यांचा ताफा त्यांच्याबरोबर होता. मराठा बांधवांनी आपल्या खाण्यापिण्याची सोय स्वतःच्या गाडीमध्ये करून मुंबईकडे कूच केली आहे.  जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जरांगे – पाटील यांच्या आगमनाने गावाहावात नवं चैतन्य संचारले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक जमले होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆