BANNER

The Janshakti News

कौतुकास्पद : शेतकऱ्याच्या मुलीची MPSC परीक्षेत बाजी ; क्लास न लावता मिळवला राज्यात प्रथम क्रमांक


सर्वसाधारण गटांमध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड

======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर        दि. २३ डिसेंबर २०२३

पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शेतकऱ्याची मुलगी एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम आली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण यांनी  एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे .व सर्वसाधारण गटांमध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड झाली आहे .
भिलवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे.बारावी सायन्सनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांच्या घरी शैक्षणिक वारसा नसतानाही त्यांनी ऑनलाइन अभ्यास करून, हे ध्येय साध्य केले आहे. त्यांचे कुटुंब शिरगाव ता. वाळवा येथील असून, भिलवडी येथे दत्तक आलेल्या आहेत. गावापासून दीड किलोमीटर अंतरावरती असलेल्या शेतवस्तीवर त्या राहतात‌. घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा नसतानाही जिद्दीने सलग १२ ते १४ तास अभ्यास केला. आई वडील हे शेतकरी व शेतमजूर असून, त्यांच्या मनामध्ये मुलगी शिकावी हि एकमेव जिद्द होती . मुलीला शिक्षणामध्ये चांगले सहकार्य आई-वडिलांनी केले. हे यश संपादन करताना त्यांनी मोठे कष्ट घेतले, मोबाईल टीव्ही यासारख्या इतर कोणत्याही गोष्टींमध्ये गुंतून न पडता त्यांनी स्वतःला अभ्यासामध्ये झोकून दिले. तासन् तास अभ्यास केल्यामुळेच त्या या यशो शिखरावरती पोहोचू शकल्या. कोणत्याही सुख सुविधा नसताना, भिलवडी सारख्या ग्रामीण भागातील शेतवस्तीवर  राहून हे यश संपादन करून, त्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर एक मोठा आणि चांगला आदर्श निर्माण केला आहे. 


याबाबत बोलताना शैलजा चव्हाण म्हणाल्या की, आईची व वडिलांची प्रेरणा व जिद्द यामुळेच मला हे ध्येय गाठणे साध्य झाले आहे. अजूनही पुढे शिक्षण घेण्याची इच्छा  असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. 

हे सर्व सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला असला तरी त्यांच्या नजरेतून आई-वडिलांचे कष्ट मात्र दिसून येत होते.

पलूस तालुक्यातील भिलवडी या एका छोट्याशा गावातील शेतवस्तीवर राहणाऱ्या मुलीने नेत्रदीपक यश संपादन केल्याने शैलजा हिने तालुक्याची व भिलवडी या आपल्या गावाची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अधिकारी बनू पाहणाऱ्या गावखेड्यातील मुलांमुलींसमोर एक आदर्श निर्माण केलाय.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆