======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. ०१ डिसेंबर २०२३
अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करा आणि वरती पाठवून द्या असे आदेश तालुका कृषी अधिकारी यांना आमदार अरुणअण्णा लाड यांनी दिले.
आमदार लाड काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असता तेथे तालुका कृषी अधिकारी संभाजी पटकुरे यांना बोलावून शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून पंचनामे करावेत असे सांगितले.
एकाबाजूने शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने भरडला जात आहे दुसऱ्या बाजूने औषधे, बियाणे आणि इतर अनुषंगिक बाजूंनी अडचणीत असताना आता आस्मानी संकटात ही तो सापडला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी विमा संरक्षण घेतले आहे त्यांना ही त्याचा योग्य परतावा मिळत नाही त्यामुळे आजही शेतकरी असुरक्षित आहे.
पलूस तालुक्यात 1700 हेक्टर द्राक्ष बागांचे क्षेत्र आहे. यातील बहुतांश द्राक्ष बागा आत्ता फुलोऱ्यात आहेत आणि अवकाळी पावसाने त्यांचे घड कुजत आहेत. डावणी, बुरशी सारख्या रोगाने हल्ला चढवला आहे. शेतात पाणी साठले आहे त्यामुळे मूळ कुज होते यामुळे फुलोऱ्याला आलेल्या द्राक्ष बागांसाह सगळ्याच बागा हातातून गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बाधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यासाठी मी आग्रही असेन.
पाऊस किती झाला तितकेच नुकसान किती झालं हे महत्त्वाचं आहे. शासनाने फक्त कागदी घोडे न नाचावता जाग्यावर जाऊन त्वरित पंचनामे करावेत असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, पी.एस.माळी, रावसाहेब गोंदिल, आनंदराव निकम, स्वप्नील पाटील, राहुल जगताप, सुनील पाटोळे, अनिल मलमे, बाधित शेतकरी आनंदराव पुदाले, तानाजी पुदाले, विजय मोरे, आनंदराव मोरे, वसंत माळी, रघुनाथ मोरे, सुरेश पुदाले, रुपेश शेंडगे, संतोष पुदाले, विलास माळी, प्रवीण चव्हाण यांचेसह शेतकरी उपस्थितीत होते.
पलूस तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकांची पाहणी करताना आमदार अरुण लाड, कृषी अधिकारी संभाजी पटकुरे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆