BANNER

The Janshakti News

वसंतदादा साखर संस्‍था पुणे येथे आधुनिक ऊस लागवड प्रशिक्षणासाठी 23 महिलांची टीम रवाना ; महिला सशक्‍तीकरणासाठी क्रांती सह.साखर कारखान्‍याचे पाऊल... आमदार अरुणअण्‍णा लाड





=====================================
=====================================

कुंडलःवार्ताहर                      दि. २० नोव्हेंबर २०२३

 येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्‍यामार्फत २३ महिला शेतकरी वसंतदादा साखर संस्‍था,पुणे येथे ४ दिवसांसाठी आधुनिक ऊस लागवड प्रशिक्षणासाठी पाठविणेत आल्‍या आहेत, महिला सशक्‍तीकरणासाठीचे हे कारखान्‍याचे पाऊल असल्‍याचे आमदार अरुणअण्‍णा लाड यांनी सांगीतले.

आमदार लाड म्‍हणाले, शेतीमध्‍ये पुरुषांबरोबरच महिलांचाही सहभाग महत्‍वाचा असतो, यासाठी महिलांना ऊस शेतीचे तांत्रीक व योग्‍य ज्ञान अवगत व्‍हावे या हेतूने कारखान्‍यामार्फत दरवर्षी महिलांना वसंतदादा साखर संघ,पुणे येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. कारखान्‍यामार्फत एकरी ऊस उत्‍पादन वाढावे म्‍हणून अनेक ऊस विकास योजना राबविल्‍या जातात. यामध्‍ये सुधारित ऊस जातीचे बियाणे, रासायनिक खते, सुक्ष्‍म खते, जिवाणू औषधे यांचा पुरवठा केला जातो. बांधपोहोच बिनव्‍याजी कंपोष्‍ट खत पुरवठा केले जाते. याशिवाय कारखाना कार्यस्‍थळावर सुसज्‍ज अशी ऊस रोप वाटीका कार्यरत असून यामधून प्‍लास्‍टीक ट्रे मधील तयार ऊस रोपे पुरवठा केली जातात. लागवडी मधील मजूर खर्चासाठी रोख रकमेचे अर्थसहाय्य केले जाते. या विविध उप‍क्रमामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकाचे एकरी उत्‍पादन वाढले आहे. ऊसविकास योजना राबविणे बरोबरच कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस लागवड तंत्रज्ञानाने प्रशिक्षीत व्‍हावा म्‍हणून कारखान्‍यामार्फत पुरुष आणि महिला शेतक-यांना प्रशिक्षणासाठी दरवर्षी वसंतदादा साखर संस्‍था पुणे येथे पाठविले जाते. या प्रशिक्षणामूळे अधीक रुंद सरीमध्‍ये ऊस लागण, लागणीसाठी कमीतकमी बियाणे वापर, ऊसाची पाचट राखणे यामध्‍ये कार्यक्षेत्रात अधीक गती मिळाली आहे असे त्‍यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी ऊस विकास अधिकारी विलास जाधव, गटाधिकारी विजय लाड, अविनाश लाड, कारखाना कर्मचाऱ्यांसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.



क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्‍यामार्फत ज्ञानलक्ष्‍मी योजने अंतर्गत महिलांना वसंतदादा साखर संस्‍था पुणे येथे प्रशिक्षणासाठी पाठविताना आमदार अरुणअण्‍णा लाड आणि प्रशिक्षणार्थी महिला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆