मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हल्लाबोल
======================================
कोल्हापूर (दि.13) : साखर उद्योगाचं यावर्षीचं धोरण ठरविण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला काहीही अर्थ नसून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर असल्याचा घनाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला होता. पण साखर सम्राटांच्या दबावामुळं शासन निर्णय अजून झाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कारखानदार जे म्हणणार तेच राज्याचं धोरण असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्याला फक्त मम म्हणणार आहेत.
साखरेचे चढे भाव आणि इथेनॉल मधून मिळालेला पैसा याचा सारासार विचार करता जवळपास सव्वा चार हजार कोटी रुपये अजूनही साखर कारखानदारांच्याकडे अतिरिक्त शिल्लक आहेत. ते दिवाळीच्या आगोदर प्रति टन चारशे रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी आमची मागणी आहे.
त्यांनी आरएसएफ चा फार्मुला आपल्यासारखा करून घेतलाय. ही सर्व गंडवागंडवी आहे. याबाबत अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून देवूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळं १७ ऑक्टोबरला होणाऱ्या समितीच्या बैठकीतही हाच निर्णय होणार, त्यामुळं या बैठकीला काय अर्थ नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆