=====================================
=====================================
शिरोळ : वार्ताहर दि. 3 सप्टेंबर 2023
ऊस वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीने अद्यावत ॲप सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या हस्ते हे ॲप कार्यान्वित करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून हजारो मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. यामध्ये जवळपास ४८५ कोटी रूपयांची १०,३३४ मुकादमांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनेक मुकादमांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या वतीने राज्यभर या करिता आंदोलन तसेच जनजागृती मेळावा सुरू करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची अद्यावत माहिती एकत्रित करण्यासाठी अद्यावत ॲप सुरू करण्यात आले.
स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते व सुकाणू समिती प्रमुख संदिप राजोबा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे पार पडला.
या ॲपमध्ये सर्व साखर कारखान्यांची यादी, ऊस तोड मजूरांबरोबर केलेले सर्व करार, त्यांचे नाव, त्यांना देण्यात आलेली रकम, सर्व मजुरांची माहिती, फसवणूक केलेल्या टोळ्यांची माहिती तसेच फसवणूक केलेल्या मुकादमांची माहिती देखील या ॲपपमध्ये असणार आहे.
करार करणाऱ्या सर्व टोळ्यांना तसेच ऊस वाहतूकदारांना या ॲपमध्ये नोंदणी बंधनकारक केले आहे. ॲपमध्ये नोंदणी करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या बरोबरच ऊस तोडणीचे करार करण्याचा निर्णय ऊस वाहतूकदार संघटनेच्या बतीने घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, या ॲपमध्ये गेल्या पाच वर्षातील फसवणूक केलेल्या टोळी मुकादमांची माहिती यामध्ये असणार असून उत्तर कर्नाटकातील उस तोडणी मजुरांची माहिती देखील
यामध्ये असणार आहे. तसेच सर्व साखर कारखान्यांची देखील या ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून या ॲपमुळे फसवणूकीस आळा बसणार आहे.फसवणूक केलेल्या टोळ्यांची अद्यावत माहिती या ॲपमध्ये असणार असून जेणेकरून या टोळ्यांकडे पुन्हा करार केले जाणार नाहीत, याचीही दक्षता यामध्ये घेतले जाणार आहे.
ऊस तोडणी मुकादमांसाठी यामध्ये तीन झोन असून प्रामाणिक मुकादमांसाठी ग्रीन झोन असून त्याचीही माहिती यामध्ये असणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या मुकादमांची नावे रेड झोन मध्ये असणार आहेत. तसेच नव्याने टोळ्या करणाऱ्या मुकादमांची ऑरेंज झोनमध्ये नावे येणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी ऊस तोडणी वहातुकदार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी विठ्ठल पाटील, रावसाहेब आबदान, दादा पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रवीण शेट्टी, विनोद पाटील, संदीप मगदूम, प्रदीप माळी, गणेश गावडे, दत्ता बाबर, अमित पाराज आदी उपस्थित होते.
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆