BANNER

The Janshakti News

सरकार व कारखानदार यांनी संगनमताने घेतला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी ..राजू शेट्टी


======================================
======================================


 पुणे : वार्ताहर                   दि 16 सप्टेंबर 2023

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले. तरीही गेल्यावर्षीच्या ऊसाचा एफआरपीप्रमाणे हिशोब पूर्ण न करता अंतिम देयके निश्चीत करण्यात आली आहे. सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेत आहे, असे घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारवर केला.

राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रुपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे. टनाला एफआरपी पेक्षा ४०० रुपये अधिक द्यावेत अशी मागणी राजू शेट्टींनी शासनाला केली आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला असून, या मागणीची पुर्तता न झाल्यास एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असेही शेट्टींनी निवेदनात नमूद केले आहे.यासंबंधी त्यांनी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांना निवेदन दिले आहे. शेट्टी म्हणाले, ‘साखरेसह व उपपदार्थांना बाजारात चांगला भाव मिळू लागला आहेत. यामुळे देशामध्ये साखर उद्योग तेजीत आहे. राज्य सरकार व साखर कारखानदार हे दोघेही संगनमताने मिलीभगत करून शेतकऱ्यांना साखरेच्या व उपपदार्थाच्या हिशोबात फसवणूक करत आहेत.’साखरेबरोबरच शेतीसंबंधीच्या अनेक विषयांना शेट्टी यांनी स्पर्ष केला. राज्यात पावसाने दडी मारली असून सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली.


यावेळी सावकार दादा मादनाईक , संदीप राजोबा , रावसो अबदान दादा पाटील , विठ्ठल पाटील , तानाजी पाटील , प्रवीण शेट्टी , अनिल कुन्नूरे उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆