BANNER

The Janshakti News

दिव्यांग मतदार नोदणी व जनजागृती शिबिराला दिव्यांग बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद..


         ८० दिव्यांग मतदारांची नोंदणी


=====================================
==============================

भिलवडी : वार्ताहर                       दि. 15 सप्टेंबर 2023

 निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या धोरणानुसार एकही दिव्यांग मतदार दिव्यांगत्वामुळे मतदानापासून वंचीत राहू नये  याच प्रमुख उद्देशाने तहसील कार्यालय पलूस व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील आयोजित विशेष शिबिरात एकूण ८०  दिव्यांग व्यक्तींनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
 दिव्यांग बांधवांना निवडणुकीच्या काळात त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबर त्यांच्यासाठी शासन  कोणत्या सुविधा देते हे माहिती करून देणे गरजेचे आहे. साहस प्रतिष्ठानने यासाठी घेतलेला पुढाकार निश्चितपणे स्तुत्य आहे. शासन स्तरावरही आपण या पुढील काळात दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी निता सावंत यांनी यावेळी बोलताना केले.

पलुसचे तहसिलदार निवास ढाणे यांनी दिव्यांग बांधवांना नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या. नायब तहसीलदार विकी परदेशी यांनी निवडणुकीच्या काळात दिव्यांगांना शासन देत असलेल्या सोयीसुविधां विषयी माहिती दिली.


महसूल सहाय्यक दिलीप करंजे, तलाठी एस. ए. जायभाय, ऑपरेटर अभिजित सांडगे यांनी यावेळी दिव्यांगांचे नवीन मतदार नोंदणी व जुने मतदान कार्ड चिन्हांकित करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरून घेतले.

साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक,अध्यक्षा सौ रूपाली पाटील म्हणाल्या, दिव्यांग बांधवांकडे सर्व स्तरातून दुर्लक्ष केले जाते. त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पुरवली जात नाही. यामुळे निवडणूक प्रक्रिये मध्येही त्यांना सर्वसामान्य सारखीच वागणूक मिळते. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी व मतदान करताना त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही या शिबिराचे आयोजन केले आहे.माझे पूर्वाश्रमीचे नाव रुपाली यशवंत मोकाशी असून माझे माहेर भिलवडी आहे. माझ्या माहेरच्या दिव्यांग बांधवांकरीता मी नेहमी तत्पर असेन.


यावेळी दिशा फाउंडेशन उपक्रमांतर्गत लेकीचे झाड म्हणून वृक्षारोपणहीं करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांशी चर्चा करून त्यांना शासन ज्या सुविधा उपलब्ध करून देते त्याबाबत सुयोग्य माहिती दिली.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कदम यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहस संस्थेचे प्रा.दिपक पाटील,अवधूत मोकाशी,संजय चौगुले,राजू सुतार, श्रीमती सुनंदा मोकाशी, दिशा फाउंडेशनचे सचिन देसाई,  कपिल शेटे,कृष्णात यादव, ग्रामपंचायत भिलवडी आदिंचे सहकार्य लाभले. भिलवडी व परिसरातील
सुमारे ८० दिव्यांग बांधवांनी या शिबिरात उस्फुर्तपणे सहभागी होऊन नव मतदार नोंदणी व जुने मतदार कार्ड चिन्हाकीत केले. यापुढे सांगली जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये असें दिव्यांगांसाठी अभियान राबवले जाणार आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆