BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड नगर येथील पथ दिव्यांचा लोकार्पण सोहळा
=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर           दि. ०८ जून २०२३

क्रांतिअग्रणींच्या नावाने उभा केलेल्या या वस्तीला कसल्याही सुविधांची कमतरता आजवर भासू दिली नाही आणि भविष्यात ही भासू देणार नाही, त्यामुळे कोणीही इथे येऊन स्टंटबाजी करत असेल तर त्याला जागीच जाब विचारा असे आवाहन जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड यांनी केले.

ते कुंडल (ता.पलूस) येथे वसवलेल्या क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड नगर येथील पथ दिव्यांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लाड, माजी सरपंच प्रमिला पुजारी, माजी उपसरपंच माणिक पवार, प्रशासक दिनेश खाडे प्रमुख उपस्थित होते.

किरण लाड म्हणाले, गावाने या वस्तीबाबत कधीही दुजाभाव केला नाही येथे रस्ते, वीज, शिक्षणाची सुविधा तत्परतेने दिली आहे. येथील प्रत्येक नागरिक हा आमचा आहे. नारळ इतका स्वस्त झाला आहे की, काही प्रसिद्धीला हपापलेले लोक तो नारळ सोबत घेऊनच फिरतायत, म्हणजे नारळ त्यांच्यासाठी खूप स्वस्त झाला आहे.

यावेळी शरद लाड म्हणाले, कोणतीही वस्ती हटवून त्यांना स्वखर्चाने जमीन विकत घेऊन पुन्हा वस्ती वसवणे हे जिल्ह्यातील एकमेव उदाहरण म्हणजे हे क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड नगर आहे. बापूंच्या विश्वासावर तुम्ही सगळे इकडे आलात, तुम्हाला इथे मिळालेली वागणूक आपुलकीची वाटल्याने, तुम्ही सर्व इथलेच झालात आणि हीच नाळ आपण आजही जपतो आहे, यातूनच आपण जी.डी.बापूंचा विचार पुढे नेवुया.

आम्ही कृतीतून काम करतो आज या वस्तीवर वीज आली, इथून पुढे ही या वस्तीला लागेल ती मदत दिली जाईल. ज्या क्रांतिअग्रणींच्या नावाने हे नगर वसवले आहे त्या क्रांतिअग्रणींच्या नावाला साजेसा विकास येथे होईल याबाबत तुम्ही निश्चिन्त रहा असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी माजी उपससरपंच राजेंद्र लाड, वसगडेचे सरपंच श्रेणीक पाटील, माजी सदस्य उज्वला जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पवार, महारुद्र जंगम, जगन्नाथ आवटे, अनिल लाड, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांचेसह वस्तीतील नागरिक उपस्थित होते.


क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड नगर येथील पथदिव्याचे उदघाटन करताना शरद लाड, किरण लाड, दिनेश खाडे, प्रमिला पुजारी, माणिक पवार आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆