BANNER

The Janshakti News

गर्जना समतेची काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक नवा प्रयोग - डॉ.श्रीपाल सबनीस=====================================
=====================================

कल्याण / ठाणे : दि. ०४ जून २०२३

( आशा रणखांबे प्रतिनिधी )  

        " गर्जना समतेची ' या कविता संग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या दोन विषयांवर विविध जाती धर्माच्या कवींनी लिहिलेल्या कविता आहेत. परिवर्तनाची नांदी येथे दिसते. संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा काव्यसंग्रह अत्यंत महत्त्वाचा  आहे. सृष्टी गुजराथी या सवर्ण कवयित्रिने 'मी आंबेडकरवादी' सारखी अप्रतिम कविता 
या संग्रहात लिहिली हे या कविता संग्रहाचे यश आहे. आजच्या अंधारलेल्या वातावरणाला प्रकाशाची मशाल दाखविण्याची ताकद या कविता संग्रहात आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक चित्र बदलण्यासाठी 'गर्जना समतेची ' हा नवा प्रयोग मला महत्त्वाचा  वाटतो." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.


 अध्यक्षस्थानी जेष्ठ मराठी हिंदी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे हे होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासन बदलापूर आणि नीलपुष्प साहित्य मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता.
            गर्जना समतेची ( संपादक नंदादा कोकाटे, राजेश साबळे ), माणुसकी जपताना ( राजेश साबळे ) आणि समर्पण ( सुहासिनी भालेराव) या तीन पुस्तकाच्या
प्रकाशन समारंभात ते बोलत होते. नीलपुष्प साहित्य मंडळाच्या कवींच्या या तीनही पुस्तकांतील सौंदर्यस्थळे त्यांनी उलगडून दाखविली.   या प्रसंगी बोलतांना प्रा.दामोदर मोरे म्हणाले की,'माणुसकी जपताना 'कथासंग्रहात कुटुंबातील नातेसंबंधातील कलहाचे भावपूर्ण दर्शन घडते तर समर्पण कविता संग्रहात सहजता , स्वाभाविकता आणि समर्पण हा मूल्यभाव प्रकट झाला आहे. गर्जना समतेची या कविता संग्रहातील कविता मध्ये आंबेडकरवादाची काही मौलिक सूत्रे सहजपणे प्रकट झालेली आहेत. संविधानिक मूल्यांमुळे सर्वसामांन्यांचं आणि आमचंही जगणं सुखकर, सुंदर आणि सुगंधी झाल्याची भावना या कविता संग्रहात प्रकट झाली आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी लेखक कवींनी संविधानिक मूल्यांची पेरणी आपल्या साहित्यातून वाचकांच्या मनोभूमीत करणे ही काळाची गरज आहे."


                   या प्रसंगी शिवाजी गावडे, नीलम भोसले यांचीही भाषणे झाली.  कीर्ती खांडे हीने सुरेल आवाजात स्वागत गीत प्रस्तुत केले.नीलपुष्प मंडळाचे संस्थापक नारायण तांबे यांच्या जन्मदिनी आणि नीलपुष्प साहित्य मंडळाच्या वर्धापन दिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संविधानाची पूजा करुनमंडळाचे अध्यक्ष राजेश साबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास ऍड.प्रज्ञेश सोनवणे, कवी नवनाथ रणखांबे, इजि . गौतम बस्ते, प्रा.दीपक गवई, वसईकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा.अनिल कवठेकर यांनी केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆