BANNER

The Janshakti News

भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रिक्त पदे भरणार तरी कधी..?.. जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष...




=====================================
=====================================

भिलवडी | दि. १४ डिसेंबर२०२२

१९ गावांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या पलूस तालुक्यातील भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंजूर सेवक वर्गापैकी बहुतांश पदे ही रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असून, येथील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असताना,जिल्हा आरोग्य विभागाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ही पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या वैद्यकीय अधिकारी , औषध निर्माण अधिकारी , आरोग्य सेवक पुरुष , आरोग्य सेवक महिला इ. रिक्त पदे आहेत. असे असले तरीही अलीकडील काळात पी.एच‌.सी मध्ये मिळत असणाऱ्या सेवांमुळे बाह्यरुग्ण विभागातील संख्या वाढली आहे. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला घेण्यात येणाऱ्या "प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान" या नाविण्यपूर्ण उपक्रमास गरोदर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात होणारा बदल यामुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत राबविल्या जात आहेत. रुग्णांची मोफत रक्त तपासणी व तातडीच्या रुग्ण सेवा देखील दिल्या जातात.
१० मे २०२१ रोजी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय (काका)पाटील यांनी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती.यावेळी खासदार संजय (काका) पाटील यांनी भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या पाहता, सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वाढीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे तसेच भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आवश्यक त्या सर्व सेवा पुरवल्या जातील तसेच येथील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे आश्वासन दिले होते. 
परंतु साधारणता महिन्यावर महिने असे अनेक महिने उलटून गेले तरी या ठिकाणी कोणतीही पदे भरण्यात आली नाहीत. परिणामी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १९ गावांमधील आरोग्य विभागाचे काम पाहताना, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा तातडीने भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी भिलवडी सह परीसरातील अनेक गावातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆■