BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सह. साखर कारखान्या मार्फत सॅटेलाईट मेपिंगव्दारे ऊसतोडणी नियोजन.. कारखाना व महिंद्रा कृषी-ई यांच्यामध्ये करार.. कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरूण (अण्णा) लाड यांची माहिती..





=====================================
=====================================

कुंडल | दि. १० डिसेंबर २०२२

क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये सॅटेलाईट मेपिंगव्दारे ऊसतोडणी नियोजन करणेचा प्रयोग करणेत येणार असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरूणअण्णा लाड यांनी दिली. 


यासाठीचे आवश्यक करार कारखाना व महिंद्रा कृषी-ई यांच्यामध्ये झाल्याचे ही त्यांनी सांगितले.
आमदार लाड म्हणाले की, "कारखान्यास उच्चतम साखर उतारा मिळणेसाठी पक्वतेनुसार ऊसतोडणी दिली जाते. पक्वता समजणेसाठी प्रचलित पध्दतीमध्ये शेती खात्यामार्फत विभागवार लागण अथवा खोडवा तारखेनुसार ऊसाची प्रातिनिधीक सॅम्पल काढली जाते. सदरची सॅम्पल वाहनातून कारखाना साईटवर आणून उत्पादन
विभागाकडील प्रयोगशाळेमध्ये साखर उतारा तपासला जातो. अपेक्षित साखर उतारा मिळालेल्या प्लॉटचा प्राधान्यक्रम ठरवून ऊस तोडणी प्रोग्राम दिला जातो. या पध्दतीमध्ये सॅम्पल काढणे, वाहतूक करणे, सॅम्पल पृथ्थकरणासाठी लागणारी केमिकल्स, यासाठी बराचसा वेळ व श्रम लागते आणि खर्चही बराच होतो. 
सॅटेलाईट मॅपिंग पध्दतीमध्ये सॅटेलाईटमधील मल्टीस्पेक्ट्रम कॅमेराच्या मदतीने ऊसाचे अनेक फोटो घेतले जातात. पानाच्या हरीतद्रव्यातील रंगाचे पृथ्थकरण व तपासणी करून शेतामध्ये उभ्या असलेल्या ऊसातील साखर टक्केवारी (पोल इन केन) सॅटेलाईटव्दारे संगणकावर उपलब्ध होते. साखर टक्केवारीची माहिती दर आठवडयाला समजणेची सोय या तंत्रज्ञानामध्ये आहे. अपेक्षित साखर टक्केवारी असलेले प्लॉट निवडून या प्लॉटचा तोडणी कार्यक्रम राबविल्यामुळे वरीलप्रमाणे होणा-या खर्चात बचत होणार आहे तसेच साखर उतारा वाढणेस मदत होणार आहे. 
कारखान्यामार्फत नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार केला जात आहे. यामध्ये शेती खात्याचे कागदविरहीत कामकाज मोबाईल ॲपवर ऊसनोंदणी, ड्रोनच्या सहाय्याने ऊसावर फवारणी असे अनेक प्रयोग
कारखाना यशस्वीपणे राबवत आहे. 
मॅपिंगव्दारे ऊसतोडणीचा प्रयोग यशस्वी झाल्यास, ऊसतोडणी कार्यक्रम अधिक पारदर्शक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे,
शेती अधिकारी दिलीप पार्लेकर,  ऊसविकास अधिकारी विलास जाधव, महिंद्रा कृषी-ई चे अधिकारी मंदार गडगे, अमोल गरूड तसेच कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆