BANNER

The Janshakti News

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता.... माळवाडी ते खटाव जाणाऱ्या जुन्या खटाव रस्त्याची फाटलेल्या गोधडी सारखी दुरावस्था...रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता....

माळवाडी  ते खटाव जाणाऱ्या जुन्या खटाव रस्त्याची  फाटलेल्या गोधडी सारखी दुरावस्था...

------------------------------------------------------------------
           सामान्य जनतेचा बुलंद आवाज.....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
-------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. १८/०१/२०२२

भिलवडी : माळवाडी (ता. पलुस) हद्दीत असणाऱ्या सांगली जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या माळवाडी ते खटाव या दोन गावाना जोडणार्‍या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्याने या रस्त्याने पायी चालणे सुध्दा अवघड झाले आहे.
भिलवडी , माळवाडी , खटाव या गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेती कामासाठी आपल्या शेताकडे रोजच्या-रोज ये-जा करावे लागते. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना या रस्त्याचा सामना करावा लागत असून रस्त्यावरील मोठ-मोठे खड्डे  आणि रस्त्यावरची उखडलेली खडी यामुळे अपघाताच्या  घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे आता " या रस्त्याची दुरुस्ती  होणार तरी कधी...? असा प्रश्न परिसरातील शेतकरी व नागरिकांना   पडला आहे.


माळवाडी हद्दीत असलेल्या निशिदी कॉर्नर ते खटाव  या रस्त्याची गेल्या अनेक वर्षात दुरुस्तीच झाली नाही. माळवाडी व खटाव हे दोन्ही गावे पलुस तालुक्यात  येत आहेत.  या दोन गावातील अंतर अंदाजे सात ते आठ कि.मी. चे असून दोन्ही गावातील  व परिसरातील नागरिकांना दळण-वळणासाठी , शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी व शेतातील ऊस  कारखाण्यास नेण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने या खडतर रस्त्याचा सामना शेतकरी, व नागरिकांना करावा लागत आहे.


हा रस्ता दोन्ही बाजूंनी पूर्णपणे खचल्यामुळे या रस्त्यावरुन दोन वाहने पास देखील होत नाहीत.
त्याचबरोबर जनावरांचा चारा (वैरण) मोटरसायकलवर व सायकलवरती बांधून शेतकरी व शेतमजूर गावाकडे येत असताना या रस्त्यावरून समोरून एखादे वाहन आले की सदर मोटर सायकल , सायकली वरचा जनावरांचा चारा (वैरण) त्या वाहनाला थटून कितीतरी वेळा शेतकऱ्यांचा व शेतमजूरांचा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात पडून अपघात देखील झाले आहेत.
सध्या ऊसतोडी चालू आहेत व ऊसाने भरलेल्या वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 


माळवाडी ते खटाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या  दुरवस्थेबद्दल जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्याशी फोनलाइन वरून चर्चा केली असता सदर रस्त्याचा पाठपुरावा चालू आहे. लवकरच या रस्त्याची मंजुरी घेऊन  या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.


  या रस्त्याची  फाटलेल्या गोधडी सारखी दुरावस्था झाल्यामुळे या भागातील नागरिकांची व शेतकऱ्यांची वाहने नादुरुस्त होणे , वारंवार अपघात होणे हे नित्याचे बनले आहे.
पूरपरिस्थितीच्या काळात सुखवाडी , खटाव , ब्रम्हनाळ येथील नागरिकांना गावातून बाहेर पडण्यासाठी व माळवाडी या गावी येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे याचे गांभीर्य  प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 या परिसरातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीव वाचवायचे असेल तर... या रस्त्याकडे संबधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्याचे लवकर नुतनीकरण करुन रस्ता डांबरीकरण करणे गरजेचे आहे. अशी चर्चा  परिसरातील गावाचे नागरिक व  परिसरातील शेतकर्‍यांच्या मधून होत आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆