पुनर्वसन विभागाच्या अधिकारी आणि दलालांच्या विरोधात आता पंढरपुरात 'हलगी नाद'
आरपीआय, भाजपा युतीकडून ८ डिसेंबर रोजी पंढरपूर तहसीलसमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन...
पंढरपूर / दि. 03/12/2021
सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा बाबत आरपीआय, भाजप युतीकडून आता पंढरपुरात येत्या ८ डिसेंबर रोजी निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन आरपीआयचे प्रदेश संघटन सचिव दिपक चंदनशिवे, भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर आणि पदाधिकाऱ्यांकडून पंढरपूरचे नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, पंडित कोळी यांना देण्यात आले.
सोलापूर पुनर्वसन विभागात प्रकल्प ग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकरणांमुळे तत्कालीन पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तातून नाराजी व्यक्त केली जात होती.
सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,मंगळवेढा माळशिरस,माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचा शोध घेऊन सदर व्यवहारात मिलीभगत करून कमी किमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे. यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी,विक्री व्यवहारही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत. काही प्रकल्पग्रस्तांच्या एकाच आदेशावर दोन-दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला आहे. आशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आरपीआयचे दिपक चंदनशिवे यांनी केली होती.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना प्रकरणनिहाय सखोल चौकशी करून १५ दिवसात स्पष्ट अहवाल सादर करावा असा आदेश २८ सप्टेंबर २०२१ रोजी दिला होता. परंतु अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आरपीआय, भाजपा किसान मोर्चाच्या वतीने येत्या ८ डिसेंबर रोजी पंढरपूर तहसीलसमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सामील होणार
असल्याची माहिती आरपीआयचे दीपक चंदनशिवे यांनी दिली .
यावेळी सुरेश नवले, नितीन काळे, संतोष ननवरे, विजयकुमार खरे, दत्ता वाघमारे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, परशुराम शिंदे, महादेव सोनवणे, सय्यद पठाण, सौ.अविंदा गायकवाड, रवी भोसले, अनिल काळे, नाथा बाबर, सुजित सोनवणे, परसू शिंदे, संजय भोसले, शाहू शिंदे, कलीम पठाण आदी उपस्थित होते.