BANNER

The Janshakti News

अंकलखोप येथे जंगली गवा रेड्याचे दर्शन... जंगली गवा रेडा सायंकाळ पर्यंत अंकलखोप शिवारातच... शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे..अंकलखोपचे सरपंच व वनविभागाकडून आवाहन...



अंकलखोप येथे जंगली गवा रेड्याचे दर्शन...

जंगली गवा रेडा सायंकाळ पर्यंत अंकलखोप शिवारातच...

शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे..अंकलखोपचे सरपंच व वनविभागाकडून आवाहन...



-------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
---------------------------------------------------------------------

अंकलखोप | दि. 23 डिसेंबर 2021

पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे गुरुवारी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास जंगली गवा रेडा अंकलखोपच्या मुख्य बाजार पेठेतून फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.हा जंगली गवा रेडा   अंकलखोप ग्रामपंचायतीच्या पाठीमागून येऊन, झेंडा चौकाचौकातून विठ्ठल मंदिरा मार्गे भगतसिंग हायस्कूल कडे जाताना ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्याचबरोबर  हा जंगली गवा रेडा अंकलखोप ग्रामपंचायतीच्या  समोरील रस्त्यावरुन जातेवेळी तो सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात देखील  कैद झाला आहे. 
त्यानंतर सकाळ पासून हा गवा अंकलखोप ते आष्टा-कारंडवाडीकडे जाणाऱ्या वाटेलगत असणाऱ्या मळीभागा परिसरामध्ये काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला.त्यामुळे शेती पंप मोटर सुरू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शेतातील उंच भागावर तसेच घर,शेड यावर उभे राहून लोक या जंगली  गवा रेड्याला बघत होते.



    अंकलखोप येथे ऊस पिकांचे मोठे क्षेत्र आहे त्यामुळे त्याला लपण्यासाठी खुप जागा आहे. या परिसरापासुन जवळच नदीकाठ परिसरात शेतकऱ्यांची घरेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांचीही या रस्त्यावर ये-जा सुरू असते. या परिसरात जंगली गव्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या जंगली गव्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.दरम्यान पलूस वनविभाग परिमंडल अधिकारी मारूती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे व अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते यांनी या परिसरामध्ये भेट देऊन,गवा दिसल्यावर  लोकांनी  सतर्कता
बाळगावी परंतू घाबरून जाऊ नये.गवा बिथरून जाईल असे काहीही करू नये तसेच त्याच्या समोर येवून त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू नये.त्याला त्याच्या मार्गाने जावू द्यावे असे आवाहन केले आहे.रात्री उशीरापर्यंत वनविभागाचे अधिकारी अंकलखोप परिसरात ठाण मांडून गव्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते.

--------------------------------------------------------------------