BANNER

The Janshakti News

माळवाडी येथील मुख्य चौकात असणाऱ्या भगव्या झेंड्याचे मोठ्या उत्साहात पूजन... कै.गजानन मोहिते यांचे चिरंजीव अथर्व मोहिते यांच्या हस्ते झाले पूजन....
माळवाडी येथील मुख्य चौकात असणाऱ्या भगव्या झेंड्याचे मोठ्या उत्साहात पूजन...

कै.गजानन मोहिते यांचे चिरंजीव अथर्व मोहिते यांच्या हस्ते झाले पूजन....भिलवडी | दि.०४/११/२०२१

पलूस तालुक्यातील माळवाडी येथे आज दि.०४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन निमित्ताने मुख्य चौकात असणाऱ्या भगव्या झेंड्याचे पूजन करुन कै. गजानन मोहिते यांनी सुरू केलेली परंपरा त्यांचे चिरंजीव अथर्व गजानन मोहिते यांनी पुढे चालू ठेवली..


माळवाडी गावच्या समाजकारण व राजकारणात कै.गजानन मोहिते यांचे नांव फार मोठे होते. गावच्या विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील असत. त्यांनी माळवाडी गावामध्ये आमदार , खासदार यांच्या फंडातून व शासकीय योजने मार्फत निधी खेचून आणून अनेक कामे केली आहेत. माळवाडीच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा व ४० ते ५० फूट उंच खांबावर फडकणारा भगवा  हे त्यांचे स्वप्न होते.  दोन वर्षांपूर्वी   त्यांच्या प्रयत्नातून मुख्य चौकात ४२ फूट उंच खांबावर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. 


प्रत्येक सणाला व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सदर खांबावर नवीन भगवा चढविणे व मोठ्या उत्साहात भगव्याचे पूजन  करण्याची परंपरा कै. गजानन  मोहिते यांनी सुरू केली होती. 
गेल्या सहा महिन्यापूर्वी कै.गजानन मोहिते यांचे कोरोनामुळे दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारासह त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुःखातून हळूहळू सावरत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कै.गजानन मोहिते यांनी सुरू केलेली परंपरा  पुढे चालू ठेवण्यासाठी आज लक्ष्मीपूजनच्या शुभ मुहूर्तावर पुढे सरसावल्याचे दिसून आले.


गजानन भाऊ मोहिते युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते ,  मित्र परिवार व माळवाडी चौकामधील व्यापारी , यांनी या भगव्या झेंड्याचे कै. गजानन मोहिते यांचे चिरंजीव अथर्व गजानन मोहिते यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात  भगव्याचे श्रीफळ वाढवून पूजन केले. या भगव्या झेंड्याचा चौथरा फुलांच्या माळ्यानी सजवण्यात आला होता. व रांगोळी काढून , पणत्या लावून रोषणाई करण्यात आली होती. आजचा हा क्षण माळवाडीकरांच्यासाठी अविस्मरणीय होता. यावेळी मुख्य चौकात असणारे व्यापारी दुकानदार यांची लक्ष्मीपूजन करण्याची लगबग तर दुसरीकडे  मुख्यचौकात असणाऱ्या भगव्या झेंड्याचे पूजन करण्याची कार्यकर्त्यांची लगबग त्यातच चौकांमध्ये होणारी फटाक्यांची आतषबाजी व प्रत्येकाच्या दुकानावर लावण्यात असलेली विद्युत रोषणाई यामुळे  माळवाडीतील मुख्य चौक आनंदमय झाल्याचे दिसून आले.


यावेळी गजानन  मोहिते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रताप पुजारी व माजी सैनिक  गैबीसाहब  शेख मेजर यांनी मनोगत व्यक्त केले.व भाऊसाहेब रुपटक्के यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.