भिलवडी ते सांगली खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या भिलवडी येथील चालक-मालक संघटनेच्या वतीने एक दिवस वाहतूक बंद ठेवून एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा दिला....
भिलवडी | 14/11/2021
एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनकरण करून चालक,वाहक, यांत्रिक कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार, कर्मचारी यांना शासकीय राज्य कर्मचारी प्रमाणे वेतन व दर वर्षी वेतन वाढ व महागाई भत्ता,ग्रेड पे,घर भाडे व नियमित वेतन मिळण्यासाठी एस. टी. कामगार व कर्मचारी संघ यांचा भर दिवाळीच्या सणा पासून काम बंद आंदोलन सुरू आहे. सदरच्या मागण्या पैकी राज्य शासनाने विलीनीकरण हि प्रमुख मागणी वगळता इतर मागण्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी एसटीचे विलिनीकरण हि असून या मागणीवरती एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे हा संप अद्यापही चालूच आहे.
त्यामुळे शहरी भागासह खेडोपाडी सर्वसामान्यांसाठी धावणारी लाल परी गेल्या काही दिवसांपासून आगारामध्येच थांबून आहे.परिणामी प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.अशा परिस्थितीमध्ये खाजगी प्रवाशी वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांची थोडीफार सोय झाली आहे.परंतू एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या रास्त असल्याने त्यांना प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी भिलवडी ते सांगली प्रवाशी वाहतूक करणाऱ्या भिलवडी तालुका पलूस येथील चालक मालक संघटनेच्या वतीने एक दिवस प्रवासी वाहतूक बंद ठेवून एस टी कर्मचाऱ्यांच्या एसटी बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी भिलवडी व परिसरातील खाजगी वाहतूक चालक-मालक संघटनेतील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.