BANNER

The Janshakti News

महापूरातील नुकसानग्रस्त पात्र लाभार्थ्यांना लवकरच होणार अनुदान प्राप्त... तहसीलदार निवास ढाणे.. मदतीपासून वंचितांना मिळणार दिलासा...



महापूरातील नुकसानग्रस्त पात्र लाभार्थ्यांना लवकरच होणार अनुदान प्राप्त...

तहसीलदार निवास ढाणे..

मदतीपासून वंचितांना मिळणार दिलासा...

पलूस | दि.२३/१०/२०२१

जुलै २०२१ च्या महापूर नुकसानी बाबत चुकीची माहिती देऊन,शासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींकडून संबंधित रकमेची वसुली करून, योग्य ती कारवाई करण्यात येईल व शासन नियमानुसार पुरबाधित नुकसानग्रस्त, पात्र लाभार्थ्यांना लवकरच नुकसान भरपाई अनुदान देण्यात येईल अशी माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली आहे.त्यामुळे महापूर नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिलेल्या पुरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

जुलै २०२१ ला आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या बहुतांश पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याच्या, तसेच घर पडझड व व्यवसाय नुकसानीबाबत कोणतीही मदत न मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभागाकडे येत होत्या.अनेकांनी विविध निवेदने दिली. उपोषण केले.काही नागरिकांनी आंदोलने केली तर काहींनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या अनुषंगाने सर्व तक्रारी अर्जांचा विचार करून, चार पथकांमार्फत तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तीन ते चार दिवसात तपासणी करून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर व शासन नियमानुसार पुरबाधित नुकसानग्रस्त, पात्र लाभार्थ्यांना लवकरच  नुकसान भरपाई अनुदान देण्यात येईल.




तसेच चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केलेल्या व्यक्तींकडून संबंधित रकमेची वसुली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. अशी माहिती पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली आहे.

सध्या पूरग्रस्त भागामध्ये अनुदानवरून शासनाच्या भूमिकेबाबत व शासन निर्णय याबाबत विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. लोकांच्यामध्ये  मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे पलूस तालुक्यातील पुरबाधित कृष्णा काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत.लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

शासन नियमांनुसार ज्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे व मदत मिळाली नाही अशा पुरग्रस्त नागरिकांनी संबंधित तपासणी पथकातील अधिकाऱ्यांना भेटून आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे असे आवाहन पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी केले आहे.