BANNER

The Janshakti News

माळवाडी येथे उपोषणणाला बसलेल्या पूरग्रस्तांनी उपोषणास तात्पुरती दिली स्थगिती... तहसीलदार यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात लेखी पत्राद्वारे दिले आश्वासन ...



माळवाडी येथे उपोषणणाला बसलेल्या पूरग्रस्तांनी उपोषणास तात्पुरती दिली स्थगिती...

तहसीलदार यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात लेखी पत्राद्वारे दिले आश्वासन ...




भिलवडी | दि. २८/१०/२०२१

सन २०१९ व जुलै २०२१ च्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित असलेल्या माळवाडी येथील मागासवर्गीय समाजातील पूरग्रस्तांचे माळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर दि.२७ ऑक्टोबर सकाळी ९:३० वाजले पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू होते. आज या उपोषणाचा दुसरा दिवस. दि.२७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सत्रात पदवीधर आमदार अरुण (आण्णा) लाड , पलूस तहसीलचे नायब तहसीलदार पी.जी.उरकुडे , पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील , विस्तार अधिकारी मुल्ला मँडम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या परंतु आंदोलनकर्त्यांच्या समस्येवरती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सदरचे उपोषण कडाक्याच्या थंडीत देखील पुढे सुरूच राहिले होते. 


दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वाजता पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी माळवाडी येथे आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणाला बसलेले कुमार मोरे , बाजीराव मोरे , तानाजी गेजगे , सुरेश कांबळे , रविंद्र देवकुळे यांच्यासह गावातील अनुदानापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांच्या सोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या शंकेचे निरसन केले.


आंदोलकांच्या ज्या मागण्या होत्या, त्यासंदर्भात पंचायत समिती पलूसचे गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले लेखी पत्र तहसीलदार निवास ढाणे यांनी आंदोलकांना दिले व उपोषण स्थगिती करण्यासाठी विनंती केली.त्यांचा आदर राखून, उपोषण कर्त्यांनी उपोषण स्थगित करण्यास सहमती दर्शविली.


तहसीलदार निवास ढाणे यांनी स्वतःच्या हाताने उपोषणकर्त्यांना सरबत दिला. यावेळी उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. आमच्या मागण्या लवकरात लवकर प्रशासनाने मान्य नाही केल्या तर पुढील काळात तीव्र आंदोलन करून आत्मदहन करण्यात येणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. यावेळी भिलवडीचे तलाठी गौसमोहम्मद लांडगे , पलूस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुल्ला मॅडम यांच्यासह माळवाडीतील वंचित पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.