BANNER

The Janshakti News

माळवाडी ग्रामपंचायतीचा पुन्हा एकदा मनमानी व भोंगळ कारभार .....

माळवाडी ग्रामपंचायतीचा पुन्हा एकदा मनमानी व भोंगळ कारभार .....

भिलवडी | दि.11/10/2021

माळवाडी ता.पलूस येथील ग्रामपंचायतीचा मनमानी व भोंगळ कारभाराचा कारनामा पुन्हा एकदा माळवाडी व भागातील जनतेच्या समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी माळवाडी ग्रामपंचायतीच्या काही  कर्मचाऱ्यानी  माळवाडीतील ग्रामपंचायतीच्या अनेक मिळकत धारकांच्या  घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये लाखो रुपयांचा  अपहार केला होता. सदरच्या  प्रकरणातील कर्मचारी व  ग्रामसेवक  आज देखील  न्यायालयाच्या वाऱ्या करीत आहेत. असे असताना देखील माळवाडी गावातील नागरिकांना जणू काही  काहीच समजत नाही " हम करे सो कायदा "  अशा प्रवृत्तीने माळवाडी ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी  कारभार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे " येरे मागल्या पुढे " असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.  

घरपट्टी, पाणीपट्टी प्रामाणिकपणे वेळेत भरुन देखील पुन्हा एकदा घरपट्टी , पाणीपट्टीचा भुर्दंड लागणार कि काय अशी चर्चा माळवाडी गावातील नागरिकांच्यामध्ये जोर धरू लागली आहे. 

सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी , सर्व कर्मचारी व माळवाडी ग्रामपंचायतीचा डिजिटल फोटो फाईल वरती छापून सदर फाईल मध्ये माळवाडी मधील मिळकत धारकांच्या  घरपट्टी , पाणीपट्टी ची मागणी बिले घालून सदरच्या फायली गावात प्रत्येक मिळकत धारकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत वाटप करण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेकांच्या  या मागणी बिलामध्ये " फुटात बारा इंचाचा फरक " असल्याची चर्चा संपूर्ण गावात , गल्ली-बोळात व चहाच्या टपरीवर होत आहे. कारण पाणीपट्टी , घरपट्टी भरून देखल पुन्हा पाणीपट्टी घरपट्टी ची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. सदरच्या या प्रकाराबद्दल माळवाडीतील  काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व घरपट्टी , पाणीपट्टी भरलेल्या परंतु  पुन्हा त्यांच्याकडे  घरपट्टी , पाणीपट्टी ची मागणी होत आहे अशा लोकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असताना देखील  घरपट्टी पाणीपट्टीची मागणी  बिले दुरुस्त न करता   वाढीव मागणी बिले वाटपाचे काम सुरूच आहे. ग्रामपंचायतीच्या अशा या मनमानी व भोंगळ कारभारा बद्दल माळवाडी येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून या गंभीर बाबींची वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदर घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील माळवाडी येथील नागरिकांच्या मधून होत आहे.