BANNER

The Janshakti News

पत्नीचा खून करून संशयित आरोपी पती फरार... धनगाव बुरुंगवाडी दरम्यान कोळसा बनवणाऱ्या आदिवासी कुटुंबात घडली घटना..पत्नीचा खून करून संशयित आरोपी पती फरार...
धनगाव बुरुंगवाडी दरम्यान कोळसा बनवणाऱ्या आदिवासी कुटुंबात घडली घटना..
भिलवडी | दि. 18/09/2021

पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी धनगांव दरम्यान लाकूड तोड करून, कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिलेचा पतीनेच खून करून फरार  झाल्याची घटना आज दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी  उघडकीस आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  गणपत पवार वय वर्ष ५०  व त्याची पत्नी कांताबाई गणपत पवार वय वर्षे अंदाजे ४० मुळगाव मलवडी ता.मावळ,जि.पुणे  हे धनगाव बुरूंगवाडी दरम्यान कॅनॉल लगत असणाऱ्या सदाशिव भिमराव चव्हाण यांच्या पडिक शेतातील काटेरी झाडांची लाकूडतोड करून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. दि. १७ सप्टेंबर रोजी दोघेही नवरा बायको बुरुंगवाडी  येथे बाजार करण्यास गेले होते. बाजार करून रात्री उशिरा ते परतले होते. रात्रीतच त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाल्याने गणपत पवार याने पत्नी कांताबाई हिला काठीने मारहाण केली व त्यातच तिचा मृत्यू झाला.त्यानंतर संशयित आरोपी गणपत पवार यांनी तिथून पलायन केले. सकाळच्या सुमारास कांताबाईचा खून झाल्याचे त्यांच्या आसपास असणाऱ्या लाकूड तोड करून कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील काही लोकांच्या  निदर्शनास आले.  सदरची घटना  भिलवडी पोलीस ठाण्यास समजताच  भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, या घटनेची सखोल चौकशी करून पंचनामा केला.


 भिलवडी पोलीसांनी  आसपासच्या गावातील सी.सी.टीव्ही फुटेज चेक केले असता,  खून  करून फरार झालेला संशयित आरोपी गणपत पवार  हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले आहे. आरोपीच्या शोधासाठी भिलवडी पोलीस ठाणे कडील तपास पथक रवाना झाले आहे.या घटनेची फिर्याद कामगारांचे मुकादम नवनाथ गोवर्धन राठोड रा.दत्तनगर, सांगली यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली असून, सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो. सांगली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो. सांगली, तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सो. तासगाव विभाग तासगाव यांच्या मार्गदर्शनाखाली  भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग हे करीत आहेत.


सी.सी.टीव्हीमध्ये दिसणारा इसम आढळून आल्यास भिलवडी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवहान भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी केले आहे.
संपर्क - 02346 237233 / 9860491449