भिलवडी व परीसरात चोरीच्या घटनेत वाढ....
नदीकाठावरील शेती पंपाच्या केबलची चोरी....
भिलवडी | दि. 02/09/2021
पलूस तालुक्यातील भिलवडी ,माळवाडी ,खंडोबाचीवाडी ,धनगांव व कृष्णा नदीकाठच्या परीसरात गेले अनेक दिवसांपासून आज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या परीसरात आज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू , रोख रक्कम, त्याचबरोबर वाहन चोरी , मोटारसायकल चोरी , जनावरांची चोरी केली आहे.
हे आज्ञात चोर यापूर्वी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरी करत होते. आत्तातर या आज्ञात चोरट्यांची इतकी मजल (धाडस) वाढली आहे की कोणालाही न घाबरता भरदिवसा घरफोडी , शेती पंपाच्या केबल चोरी , मोटारसायकल चोरी , मोबाईल चोरी करु लागले आहेत.
आज्ञात चोरट्यांनी 22 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी माळवाडी मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करुन मुद्देमाल लंपास केला होता.
तर 31 जुलै रोजी खंडोबाचीवाडी येथे भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता.
व कालच 1 सप्टेंबर रोजी माळवाडी, चोपडेवाडी व खंडोबाचीवाडी या तीन गावांना संयुक्त नळ पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या जॅकवेलवरील इलेक्ट्रीक मोटारीची 140 फूट केबल भरदिवसा दुपारी 12:00 ते 1:00 च्या दरम्यान आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार ग्रामपंचायत माळवाडी यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे अशी माहिती माळवाडी ग्रामपंचायती कडून सांगण्यात आले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून भिलवडी व परिसरातील नागरिक नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच मेटाकुटीला आले आहेत. कोरोनाचा संसर्ग , शासनाने केलेला लॉकडाऊन , अतिवृष्टी , कृष्णा नदीला आलेला महापूर , आणि त्यातच आता भरदिवसा घरफोडीच्या घटना यामुळे भिलवडी व परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. भिलवडी पोलीसांनी या सर्व गंभीर घटनांची गांभीर्याने दखल घेऊन या अज्ञात चोरट्यांचा तातडीने तपास लावून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी भिलवडी व परिसरातील नागरिकांच्या कडून केली जात आहे.