भिलवडी येथे बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांचे आंदोलन...पूरग्रस्त व्यापारी आक्रमक
भिलवडी | दि. 01 / 09 / 2021
भिलवडी ता. पलूस येथील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी आज दि. 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळपासून ते अकरा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार पूर्णपणे कडकडीत बंद ठेवून ग्रामपंचायतीच्या जवळ असणाऱ्या हनुमान मंदिराच्या कट्ट्यावरती शासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले.
22 जुलै 2021 रोजी भिलवडी येथील कृष्णा नदीला आलेल्या महापूराला आज एक महिना होऊन गेला आहे. महापुरामुळे भिलवडी व परिसरातील नदीकाठच्या गावांना मोठा तडाखा बसला होता. महापुरामध्ये शेतकरी , व्यापारी वर्ग व नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले होते महापुराच्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाकडून तातडीची मदत अपेक्षित असते ती शासनाने जाहीर ही केली होती परंतु शासनाची तातडीची मदत अजून पर्यंत कोणालाही मिळालेली नाही. कोरोनाच्या संकटात आधीच डबघाईला गेलेल्या व्यापाऱ्याला ताबडतोब आर्थिक मदतीची अपेक्षा असताना शासन मदत करण्यासाठी दिरंगाई करत आहे याच्या निषेधार्थ आज सकाळी अकरा वाजेपर्यंत भिलवडी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून भिलवडी ग्रामपंचायत जवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या कट्ट्यावरती बसून शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आंदोलन केले.
या आंदोलनाच्या वेळी बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की आम्ही आज तातडीच्या मदतीसाठी फक्त अकरा वाजेपर्यंत व्यापार बंद ठेवून आंदोलन करीत आहोत परंतु पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेली तातडीची मदत शासनाकडून तात्काळ नाही मिळाल्यास भिलवडी येथील सर्व व्यापारी आपले सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेऊन बेमुदत संप करणार असल्याचा इशारा देण्यात आलाआहे.
यावेळी भिलवडी येथील तलाठी गौसमोहम्मद लांडगे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली व व्यापाऱ्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. सदरचे निवेदन हे तात्काळ शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल असे आश्वासन गौसमोहम्मद लांडगे यांनी दिले आहे.
व्यापार्यांच्या या कडकडीत बंदला भिलवडी येथील व्यापाऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता. व या आंदोलनात सर्व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.