BANNER

The Janshakti News

भिलवडी व परीसरातील गणेशभक्तांच्या " मनात उत्साह पण आनंदात विरजण..."

भिलवडी व परीसरातील गणेशभक्तांच्या " मनात उत्साह पण आनंदात विरजण..."








भिलवडी | दि.11/09/2021

भिलवडी आणि परिसरामध्ये गणेशोत्सवावरती सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट दिसून आले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शासन नियमांचे पालन करून, गर्दी टाळण्याबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून आपआपल्या घरीच गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.


  नुकताच येऊन गेलेला महापूर व गेल्या दिड दोन वर्षांपासून पसरलेल्या कोरोनाच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर 
भिलवडी व परिसरातील गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नागरिकांनी आप आपल्या घरीच गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे दरवर्षी गणरायाच्या स्वागतावेळी होणारी गणेश भक्तांची लगबग यावर्षी दिसून आली नाही. 


दरवर्षी गणरायाच्या स्वागतासाठी लावण्यात येणारे मोठ मोठे डीजे, बँड, बँजो, मंडप,भले मोठे स्टेज तसेच विविध मंडळांच्याकडून गणरायाच्या समोर करण्यात येणारी विद्युत रोषणाई यापैकी काही ही यावर्षी कुठेही नजरेस पडले नाही. गणेश मूर्ती व सजावटींचे साहित्य विक्री करणारे अनेक स्टॉल बाजारपेठांमध्ये उभारले गेले होते परंतु  ग्राहक मात्र जेमतेमच होते. गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्त आतुरले होते. मनातून आनंदी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्ती येऊनही गणेशोत्सवानिमित्त  गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.


 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन ‌करणे गरजेचे असल्याने शासनाच्या वतीने गेल्या दिड दोन वर्षांपासून अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव , जत्रा - यात्रा यांच्यावरती प्रतिबंध करण्यात आला आहे.प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव सण साजरा करताना गर्दी टाळण्याबाबत, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा न करता आप आपल्या घरी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याबाबत तसेच गावागावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याबाबत आवाहन केले होते.




त्यामुळे एका पेक्षा एक आकर्षक गणेश मुर्ती बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असताना देखील गणेश मुर्ती खरेदी करताना लोकांची झुंबड पाहायला मिळाली नाही. परिणामी अनेक ठिकाणचे गणेश मूर्ती विक्री स्टॉल ओस पडलेले दिसले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांच्या मनात उत्साह असला तरी आनंदावर मात्र विरजण पडल्याचे दिसून आले.  गणेश भक्तांनी अगदी साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत केले.